६० वर्षांच्या एका भोंदूबाबाला पोलिसांनी १२० महिलांवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. हरियाणा पोलिसांनी ही कारवाई केली असून या बाबाचे नाव महंत बाबा अमरपुरी (खरे नाव अमरवीर) उर्फ बिल्लू असे असल्याचेही समोर आले आहे. या भोंदूबाबाने आत्तापर्यंत १२० महिलांवर बलात्कार केला. प्रत्येक महिलेवर बलात्कार करताना त्याने त्याची व्हिडिओ क्लीप तयार केली. त्यानंतर हा भोंदूबाबा या व्हिडिओंद्वारे महिलांना ब्लॅकमेल करत होता अशीही माहिती पोलिसांनी दिली.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार या भोंदूबाबाच्या एका नातेवाईकाने पोलिसांना त्याच्याबद्दल माहिती दिली. तसेच या बाबाने आत्तापर्यंत १२० महिलांवर बलात्कार केल्याचेही त्यानेच पोलिसांना सांगितल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी बाबा अमरपुरीला अटक केले त्यानंतर त्याची रवानगी पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत करण्यात आली आहे अशीही माहिती फतेहबाद पोलीस ठाण्याच्या प्रभारी निरीक्षक बिमला देवी यांनी दिली.

या भोंदूबाबावर बलात्कार, विनयभंग यासहीत इतर गुन्हेही नोंदवण्यात आले आहेत. आयटी अॅक्टच्या कलमांनुसारही त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशीही माहिती बिमला देवी यांनी दिली. माझे म्हणणे तुम्ही ऐकले नाही तर तुमच्या व्हिडिओ क्लिप मी व्हायरल करेन अशी धमकी हा भोंदू बाबा सगळ्या महिलांना देत असे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या भोंदूबाबावर ९ महिन्यांपूर्वी बलात्काराचा एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडित महिलेच्या पतीने यासंबंधीची तक्रार नोंदवली होती. या भोंदूबाबाने मंदिरातच बलात्कार केला असेही तक्रारीत म्हटले होते.

Story img Loader