हरियाणाच्या पानिपतमध्ये २०२१ साली झालेल्या एका खूनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. एका महिलेने आपल्या प्रियकराबरोबर मिळून स्वतःच्या पतीचा खून केला. मृत पती विनोद बरडा यांचा ५ ऑक्टोबर २०२१ रोजी अपघात झाला. या अपघातामधून विनोद बरडा कसेबसे बचावले. पण त्यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली. दोन महिन्यांनी ५ डिसेंबर २०२१ रोजी त्यांची पानिपतमधील घरात गोळी झाडून हत्या करण्यात आली. हत्येचा फेरतपास करत असताना अडीत वर्षांनी पोलिसांना आढळले की, विनोद बरडा यांची पत्नी निधी आणि तिचा प्रियकर सुमीतने कट रचून विनोदला संपविले. आधी त्यांनी अपघाताद्वारे विनोदला मारण्याचा प्रयत्न केला, पण त्यातून ते बचावले. त्यानंतर त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.
डिसेंबर २०२१ मध्ये विनोद यांची हत्या झाल्यानंतर त्याच्या काकांनी पोलिसांकडे धाव घेतली होती. ऑक्टोबरमध्ये देव सुनार नावाच्या वाहन चालकामुळे विनोदचा अपघात झाला होता. देव सुनारवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्याकडून हे प्रकरण मिटविण्यासाठी विनोदवर दबाव टाकण्यात येत होता. तसेच धमक्याही देण्यात येत होत्या. १५ डिसेंबर २०२१ रोजी देव सुनार विनोदच्या पानिपत येथील घरी आला आणि त्याने घरात येऊन आतून दरवाजे बंद केले. त्यानंतर विनोद यांच्यावर गोळीबार केला.
विनोद बरडा यांचा खून झाल्यापासून देव सुनार तुरुंगात आहे. मात्र मध्यंतरी विनोद बरडा यांच्या ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या भावाने या प्रकरणात आणखीही आरोपी असल्याचा संशय व्यक्त केला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा पुन्हा एकदा तपास सुरू केला. यासाठी न्यायालयातून फेरतपास करण्याची परवानगी मागण्यात आली.
दुसऱ्यांदा तपास करताना आढळले की, देव सुनार हा सुमीत नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात होता. सुमीतचे या काळात विनोदची पत्नी निधीशी वारंवार संभाषण सुरू होते. ७ जून रोजी पोलिसांनी सुमीतला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने विनोद यांचा अपघात आणि हत्येचा कट रचल्याचे कबूल केले.
सुमीतने सांगितले की, २०२१ साली त्याची आणि निधीची जिममध्ये ओळख झाली. सुमीत त्याठिकाणी प्रशिक्षक म्हणून कार्यरत होता. सुरुवातीला मैत्री आणि नंतर दोघांचे प्रेमप्रकरण सुरू झाले. विनोदला या प्रकरणाची कुणकुण लागल्यानंतर त्याचे आणि पत्नी निधीचे जोरदार भांडण झाले. या भांडणानंतर निधी आणि सुमीतने विनोदचा काटा काढण्याचा निर्णय घेतला.
पोलिसांनी सांगितले की, विनोद बरडाचा खून करण्यासाठी सुमीतने देव सुनारला १० लाख रुपये आणि खून करण्यासाठीचा इतर सर्व खर्च दिला होता. देव सुनारला पंजाबमध्ये नोंदणी असलेला ट्रक पुरविला गेला. ज्याद्वारे विनोदला धडक मारली. पण नशीब बलवत्तर म्हणून विनोद त्यातून वाचले. त्यानंतर मग गोळी झाडून जीवे मारण्याची योजना आखण्यात आली. देव सुनारला अपघाताच्या गुन्ह्यातून जामीन मिळताच त्याने विनोदच्या घरी धडक देत त्यांची गोळ्या झाडून हत्या केली.
सुमीत आणि निधीला शनिवारी न्यायालयात सादर केल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.