लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपा आणि एनडीएला टफ फाईट देण्याकरता इंडिया आघाडीने जोरदार तयारी सुरू केली आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल समोर आल्यानंतर भाजपाविरोधात कठोर रणनीती आखणे गरजेचे असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर आज इंडिया आघाडीची दिल्लीत बैठक पार पडली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत देशभरातील २८ महत्त्वाचे नेते उपस्थित होते. तसंच, इंडिया आघाडीतील अनेक घटकपक्षही आज उपस्थित होते. आजच्या बैठकीत इंडिया आघाडीचा समन्वयक, पंतप्रधान पदाचा चेहरा आणि जागा वाटपासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, ही बैठक संपल्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महत्त्वाची माहिती दिली.
इंडिया आघाडीपुढे जागा वाटपाचा मोठा तिढा आहे. विविध राज्यातील अनेक पक्ष या आघाडीत सामिल असल्याने जागा वाटपासाठी चोख नियोजन करावं लागणार आहे. तसंच, पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. याबाबत मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, आम्हाला आधी सर्वांना जिंकून यावं लागणार आहे. जिंकण्यासाठी काय करायचं आहे, याचा विचार करावा लागेल. पंतप्रधान कोण होणार ही नंतरची गोष्ट आहे. खासदारच नाही आले तर पंतप्रधान ठरवून काय फायदा? त्यामुळे आधी आम्ही संख्या वाढवण्याकरता एकत्रितपणे लढून बहुमत आणण्याचा प्रयत्न करू.
“एक-दोन निवडणुका झाल्यानंतर मोदींना प्रचंड गर्व आला आहे की संपूर्ण जगात मीच एकटा नेता आहे, असं त्यांना वाटू लागलं आहे. त्यामुळे आम्ही आधी जिंकण्याचा प्रयत्न करू आणि एक होऊन आम्ही लढू”, असंही ते म्हणाले.
आजच्या बैठकीत काय ठरलं?
“आजच्या चौथ्या बैठकीत २८ पक्षांनी सहभाग घेतला होता. या २८ पक्षाच्या नेत्यांनी त्यांची मते समितीसमोर ठेवली आहेत. समस्या सोडवण्याकरता संपूर्ण देशभर ८ ते १० बैठका सर्वांनी मिळून करण्याचा निर्णय झाला. आजची बैठक दोन ते तीस चालली”, असं मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.
“१५१ खासदारांना सभागृच्या बाहेर टाकून सरकार चालवत आहे. हे लोकशाहीच्या विरोधात आहे. लोकशाहीला वाचवायचं असेल तर आपल्याला एकत्र येऊन लढावं लागेल आणि त्यासाठी आपण सर्व तयार आहोत. देशाच्या लोकशाहीत हे पहिल्यांदाच घडलं आहे की. जो मुद्दा सभागृहात उचलला आहे तो चुकीचा नव्हता. जे लोक सभागृहाच्या आतमध्ये आले, ते कसे आले? त्यांना कोणी आणलं? कोणत्या प्रकारे त्यांनी सर्व ठिकाणी जाऊन घोषणाबाजी केली. आम्ही आधीपासूनच सांगत आलोय की गृहमंत्री आणि पंतप्रधांनांनी सभागृहात यावं आणि जे घडलंय त्याबाबत सभागृहात माहिती द्यावी. परंतु, त्यांनी ऐकलं नाही, असं मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.
खासदारांच्या निलंबनाविरोधात २२ डिसेंबरला देशभर आंदोलन
“मला कळत नाही, सभागृह सुरू असताना हे विविध ठिकाणी उद्घाटनाला जातात. हे काय सुरू आहे. असं कधीच नाही झालं. सगळीकडे भाषण द्यायला जातात पण, लोकसभा आणि राज्यसभेत हे येत नाहीत. लोकशाही संपवायची यांची इच्छा आहे. १५१ लोकांचं निलंबन करून त्यांना बाहेर काढण्यात आलं आहे. हे पहिल्यांदाच घडलं आहे. हे अत्यंत वाईट आहे. या विरोधात आम्ही लढणार आहोत. याविरोधात आम्ही मैदानात जाणार आहोत. आज पंतप्रधान आणि गृहमंत्री समजत आहेत की त्यांच्याशिवाय या देशात कोणीच नाही, तर त्यांचा हा समज संपवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. सर्वजण मिळून आंदोलन करणार आहोत. २२ डिसेंबर रोजी आम्ही देशभर याविरोधात आंदोलन करणार आहोत”, असंही मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.
जागा वाटप कसं होणार?
“इंडिया आघाडीचा एक मुद्दा आहे, सर्व लोक मिळून काम करतील. राज्या-राज्यातील नेते एकत्र येऊन जागा वाटपाबाबत चर्चा करतील. राज्यांतर्गत हा प्रश्न हाताळता नाही आला तर त्यावर इंडिया आघाडीचे नेते यावर चर्चा करतील. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगणा, बिहार, उत्तर प्रदेशातील समस्या यामुळे सुटतील. दिल्ली, पंजाबमधील समस्याही सोडवल्या जातील. हे आजच्या बैठकीत ठरवण्यात आलं आहे. या बैठकीत २८ पक्षातील नेत्यांनी सहकार्य केलं”, असंही खरगे म्हणाले.