Hate Speech : भारतात २०२४ मध्ये मुस्लिम आणि त्यांच्यासारख्या अल्पसंख्याकांविरोधात द्वेषयुक्त भाषणांमध्ये ७४ टक्के वाढ झाली आहे असं वॉशिंग्टनच्या इंडिया हेट लॅब या संशोधन समूहाने त्यांच्या अहवालात ही बाब नमूद केली आहे. मागच्या वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये भारतात लोकसभा निवडणूक पार पडली त्या दरम्यान ही वाढ झाल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. भारतात २०२४ या वर्षात १ हजार १६५ घटना अशा होत्या ज्यात द्वेषपूर्ण भाषणं केली गेल्याने घडल्या. या नोंद झालेल्या घटना आहेत त्याआधीच्या वर्षात ही संख्या ६६८ च्या आसपास होती. मात्र धार्मिक आणि राजकीय रॅली, सांस्कृतिक मेळावे, निषेध मोर्चे या सगळ्यांमध्ये हे प्रमाण वाढल्याचं दिसून येतं आहे.
भारतात २०२४ या काळात लोकसभा निवडणूक पार पडली
२०२४ मध्ये भारतात लोकसभा निवडणूक पार पडली. १ एप्रिल ते १ जून अशा सात टप्प्यांमध्ये मतदान झालं. देशाच्या विविध भागांमध्ये प्रचारसभा झाल्या होत्या. नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह अनेक नेते प्रचाराच्या मैदानात उतरले होते. तर विरोधी पक्षातील राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्याही सभा मोठ्या प्रमाणावर पार पडल्या. मात्र २०२३ च्या तुलनेत २०२४ या वर्षात सर्वाधिक द्वेषपूर्ण भाषणं झाली हे प्रमाण ७४ टक्क्यांनी वाढल्याचं अहवाल सांगतो आहे. इंडिया हेट लॅबने या संदर्भातला अहवाल दिला आहे.
डोनाल्ड ट्रम्प आणि मोदी भेटीच्या आधी अहवाल समोर
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी मागील महिन्यात शपथ घेतली. लवकरच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट होणार आहे त्या पार्श्वभूमीवर हा अहवाल महत्त्वाचा मानला जातो आहे. या दोन नेत्यांच्या भेटी दरम्यान हा मुद्दा चर्चेला येणार का? याचीही आता चर्चा सुरु झाली आहे. १६ मार्च ते १ जून २०२४ या कालावधीत तिरस्कार पसरवणारी भाषणं भारतात मोठ्या प्रमाणावर झाली. इंडिया हेट लॅबने हा अहवाल सादर केला आहे. रॉयटर्सने हे वृत्त दिलं आहे.
२०२३ मध्ये काय घडलं होतं?
इंडिया हेट लॅबने २०२३ चा जो अहवाल दिला होता त्यानुसार हेट स्पीच ६६८ घटना घडल्या होत्या. द हिंदू ने दिलेल्या एका रिपोर्टनुसार द्वेषयुक्त भाषणाच्या ४९८ घटना भाजपा शासित राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये झाल्या होत्या. तर १६९ भाषणांमध्ये मुस्लिमांच्या धार्मिक स्थळांवर टीका करण्यात आली.