प्रक्षोभक भाषणामुळे वादग्रस्त ठरलेल्या मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीनचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी (४२) यांना मंगळवारी अटक करण्यात आली. ओवैसी हे सोमवारी लंडनहून येथे आले होते. वैद्यकीय अहवालानंतर अटकेची कारवाई पोलीस करणार होते. येथील गांधी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून अहवाल मिळताच त्यांना अटक करण्यात आली. कडक बंदोबस्तात त्यांना येथून २०० कि.मी. अंतरावर असलेल्या अदिलाबाद जिल्ह्य़ातील निर्मल येथे नेण्यात आले. या मार्गावरही कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली होती.
चारमिनार भागातील भाग्यलक्ष्मी मंदिरासंबंधात वादग्रस्त विधाने केल्याबद्दल हैदराबादसह राज्यातील विविध पोलीस ठाण्यांत त्यांच्याविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या. निर्मल येथील न्यायालयात त्यांना याप्रकरणी हजर करण्यात येणार आहे.
ओवैसी यांनी आपल्याला बरे वाटत नसल्याचे कारण दिले होते व पोलिसांसमोर येण्यास टाळाटाळ केली होती. त्यामुळे मंगळवारी सकाळी पोलिसांनी त्यांच्या बंजारा हिल्स येथील घरी जाऊन त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी गांधी रुग्णालयात आणले, असे पश्चिम विभागाचे पोलीस उपायुक्त जी. सुधीर यांनी सांगितले.
त्याअगोदर मंगळवारी सकाळी अदिलाबाद जिल्ह्य़ातील निर्मल ग्रामीण पोलिसांनी त्यांना वैद्यकीय तपासणीला सामोरे जाण्याबाबत नोटीस जारी केली होती. आपल्या भाषणात वादग्रस्त विधाने करणारे ओवैसी हे चौकशीला सामोरे जाऊ शकतात. त्यासाठी त्यांची प्रकृती उत्तम आहे, असे चौकशी अधिकारी ए. रघू यांनी त्यांच्या भेटीनंतर सांगितले. मात्र, आमदार ओवैसी यांनी आपल्या वेदना कायम असून चौकशीला सामोरे जाण्यासाठी चार दिवसांचा अवधी द्यावा, अशी मागणी केली होती. त्यावर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला व त्यास सामोरे जाण्याचा आदेशही त्यांना दिला. त्यानुसार सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी करून त्यांच्या प्रकृतीबाबतचा अहवाल सादर केला.
राज्यातील अनेक पोलीस ठाण्यांत आपल्याविरोधात नोंदवण्यात आलेले एफआयआर रद्द करण्यात यावेत, यासाठी ओवैसी यांनी याअगोदरच उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा