उत्तर प्रदेशातल्या हाथरस (Hathras) या ठिकाणी झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ लोकांचा मृत्यू झाला आहे. या ठिकाणी जो सत्संग होता. भोलेबाबांच्या सत्संगात मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. या ठिकाणी चेंगराचेंगरी झाली. चेंगराचेंगरीच्या आधी काय घडलं? तो व्हिडीओ आता समोर आला आहे.

या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार, आयोजकांनी ८० हजार लोकांच्या मेळाव्यासाठी परवानगी मागितली होती. परंतु, या कार्यक्रमात तब्बल अडीच लाखांहून अधिक जमले होते. तसंच, त्यांच्यावर पुरावे बदलण्यात आल्याचेही आरोप आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

मंगळवारी नेमकं काय घडलं?

मंगळवारी स्थानिक धर्मोपदेशक नारायण साकार विश्व हरी उर्फ ​​भोले बाबा यांनी आयोजित केलेल्या सत्संगाच्या वेळी ही चेंगराचेंगरी झाली. “या कार्यक्रमात अपेक्षेपेक्षा हजारो लोक आले होते. भोले बाबांनी सत्संगस्थळ सोडल्यानंतर त्यांचा स्पर्श झालेली माती गोळा करण्याकरता गर्दी जमली. त्यासाठी लोक जमिनीवर पसरले होते. यामुळे चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत भाविक जवळच्या नाल्यात पडले,” या घटनेत १२१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर या घटनेच्या आधी काय घडलं तो व्हिडीओही समोर आला आहे.

हे पण वाचा- Hathras Stampede : “क्षमतेपेक्षा अधिक लोक जमले, भोले बाबांचा स्पर्श झालेली माती घेण्यासाठी गर्दी झाली”, FIR मधून धक्कादायक खुलासे!

चेंगराचेंगरीच्या आधी काय घडलं?

“भोलेबाबा हे स्टेजवरच्या आसनावर बसून बोलत होते. त्यांना पाहण्यासाठी काही महिला खांबावर चढल्या होत्या. महिला, पुरुष आणि लहान मुलं मांडवात उभे राहिले होते आणि भोले बाबांचा जयजयकार करत होते. भोलेबाबांना पाहण्यासाठी ही सगळी गर्दी झाली. याच सगळ्या गडबडीनंतर चेंगराचेंगरीची घटना घडली.” प्रमाणापेक्षा जास्त लोक आल्याने ही घटना घडली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेत जे जखमी झाले आहेत त्यांवर उपचार सुरु करण्यात आले आहेत. तसंच मृतांच्या नातेवाईंना मदत जाहीर करण्यात आली आहे.एका महिलेने ही माहिती दिली

कोण आहेत भोलेबाबा उर्फ सूरजपाल?

भोले बाबा यांचं मूळ नाव सूरजपाल आहे. कासगंज जिल्ह्यातील बहादुर नगरचे ते मूळ निवासी आहेत. सूरजपालने १९९० च्या दशकात पोलीस कर्मचारी म्हणून करत असलेली नोकरी सोडली. त्यानंतर त्यांनी प्रवचन देण्यास आणि सत्संगाचे कार्यक्रम करण्यास सुुरवात केली. सूरजपाल अर्थात भोलेबाबांना मूल बाळ नाही. त्यांची पत्नीही त्यांच्या बरोबरच सत्संगात असते. त्यांचे लाखो अनुयायी आहेत.

एफआयरमध्ये काय म्हटलंय?

एफआयआरनुसार, आयोजकाने या कार्यक्रमात सुमारे ८० हजार भाविकांना एकत्र येण्यासाठी परवानगी मागितली होती. परंतु, या संस्थेने यापूर्वी आयोजित केलेल्या कार्यक्रमांसाठी लाखो भाविक जमले होते हे उघड केले नव्हते. तसंच, मंगळवारच्या कार्यक्रमासाठी विविध जिल्ह्यांतून आणि जवळपासच्या राज्यांतून सुमारे अडीच लाख लोक जमले होते. परवानगीच्या अटींचे पालन न केल्याने जीटी रोडवरील वाहतूक ठप्प झाली होती. आज तकने हे वृत्त दिलं आहे.

याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १०५, ११०, १२६ (२), २२३ आणि २३८ अंतर्गत मुख्य स्वयंसेवक देवप्रकाश मधुकर आणि इतर अज्ञात आयोजक आणि स्वयंसेवकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मुख्य सचिव मनोज कुमार सिंह यांनी मंगळवारी सांगितले की उपदेशक नारायण साकार विश्व हरी उर्फ ​​भोले बाबा यांच्यावर कारवाई केली जाईल, परंतु या प्रकरणात दाखल झालेल्या पहिल्या एफआयआरमध्ये त्यांचे नाव नाही. दरम्यान, एफआयआरमध्ये भोले बाबाचे नाव नसल्याने मृतांच्या कुटुंबीयांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. लोक बाबांमुळे आले होते. त्यामुळे भोले बाबाला मुख्य आरोपी मानलं पाहिजे, असं स्थानिकाने पीटीआयला सांगितले.