Hathras Stampede Updates: उत्तर प्रदेशातल्या हाथरस या ठिकाणी भोलेबाबांचा सत्संग आयोजित करण्यात आला होता. या सत्संगात चेंगराचेंगरी झाली. त्यात १२१ जणांचा बळी गेला आहे. तर अनेक लोक जखमी झाले आहेत. आता या सगळ्या प्रकरणावर भोलेबाबा उर्फ नारायण सरकार हरि यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. जे काही घडलं त्याचा मला खेद वाटतो आहे असं भोलेबाबांनी म्हटलं आहे.

मंगळवारी नेमकं काय घडलं?

मंगळवारी स्थानिक धर्मोपदेशक नारायण साकार विश्व हरी उर्फ ​​भोले बाबा यांनी आयोजित केलेल्या सत्संगाच्या वेळी ही चेंगराचेंगरी झाली. “या कार्यक्रमात अपेक्षेपेक्षा हजारो लोक आले होते. भोले बाबांनी सत्संगस्थळ सोडल्यानंतर त्यांचा स्पर्श झालेली माती गोळा करण्याकरता गर्दी जमली. त्यासाठी लोक जमिनीवर पसरले होते. यामुळे चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत भाविक जवळच्या नाल्यात पडले,” या घटनेत १२१ जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी भोलेबाबांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी एक पत्रक काढून आपलंं म्हणणं मांडलं आहे.

भोले बाबांनी नेमकं काय म्हटलं आहे?

मी चेंगराचेंगरी होण्याआधीच तिथून निघालो होतो. चेंगराचेंगरीत ज्या लोकांचा मृत्यू झाला त्यांना मी आदरांजली वाहतो. तसंच जे जखमी झाले आहेत त्यांना देव लवकर बरं करो अशी प्रार्थना करतो. मी या प्रकरणासाठी वरिष्ठ वकील डॉ. ए.पी. सिंह यांना कारवाई करण्याची विनंती केली आहे. कारण काही समाजकंटकांमुळे चेंगराचेंगरी झाली. असं भोलेबाबांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- Hathras Stampede : चेंगराचेंगरीत १२१ जण ठार झाल्यानंतर भोले बाबा कुठे गेले? शोधमोहिमेनंतर पोलीस म्हणाले…

FIR मध्ये काय म्हटलं आहे?

FIR मध्ये दिलेल्या माहितीनुसार चेंगराचेंगरी झाली त्याआधीच भोलेबाबा निघत होते. दुपारी दोन वाजता हाथरस येथील सत्संगाच्या ठिकाणी भोलेबाबांच्या अनुयायांची मोठी गर्दी झाली. त्यानंतर एकच हलकल्लोळ माजला. FIR मध्ये हेदेखील नमूद करण्यात आलं आहे की लोक नाल्यात पडले आणि त्यानंतर चेंगराचेंगरी वाढली. या दुर्घटनेत आत्तापर्यंत १२१ जणांचा मृत्यू झाला. तर अनेक लोक जखमी झाले. जे लोक जखमी झाले आहेत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

चेंगराचेंगरीच्या आधी काय घडलं?

“भोलेबाबा हे स्टेजवरच्या आसनावर बसून बोलत होते. त्यांना पाहण्यासाठी काही महिला खांबावर चढल्या होत्या. महिला, पुरुष आणि लहान मुलं मांडवात उभे राहिले होते आणि भोले बाबांचा जयजयकार करत होते. भोलेबाबांना पाहण्यासाठी ही सगळी गर्दी झाली. याच सगळ्या गडबडीनंतर चेंगराचेंगरीची घटना घडली.” प्रमाणापेक्षा जास्त लोक आल्याने ही घटना घडली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेत जे जखमी झाले आहेत त्यांवर उपचार सुरु करण्यात आले आहेत. तसंच मृतांच्या नातेवाईंना मदत जाहीर करण्यात आली आहे.एका महिलेने ही माहिती दिली