Hathras Stampede Updates: उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या आता १२१ झाली आहे. हाथरसमध्ये आयोजित सत्संगसाठी मोठ्या संख्येनं नागरिक जमा झाले होते. भोले बाबा यांच्यासाठी हा सत्संग आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी जमावामध्ये चेंगराचेंगरी झाल्यामुळे ही भीषण दुर्घटना घडली. या प्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या दुर्घटनेनंतर भोले बाबा यांचा ठावठिकाणा कुणालाही माहिती नसून त्यांचा शोध घेतला जात आहे. मात्र, हे भोले बाबा कोण आहेत? यासंदर्भात आता मोठी माहिती समोर येऊ लागली आहे.

नेमकं काय घडलंय हाथरसमध्ये?

हाथरस जिल्ह्यातील सिकंदराबाद येथे भोले बाबा यांच्या सत्संगासाठी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यासाठी मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित राहिले होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास हा कार्यक्रम संपला. त्यानंतर भोले बाबा कार्यक्रम स्थळावरून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या गाडीच्या दिशेनं लोक निघाले. या धावपळीत काही लोक खाली पडले आणि ढकलाढकलीला सुरुवात झाली. या गर्दीत मोठ्या संख्येनं लहान मुलं आणि महिलांचाही समावेश होता. ढकलाढकलीचं रुपांतर चेंगराचेंगरीत झालं आणि एकच गडबड उडाली.

या दुर्घटनेत तब्बल १२१ जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये लहान मुलांची संख्या जास्त असल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना उत्तर प्रदेश सरकारकडून ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेनंतर हे भोले बाबा कोण आहेत? यावर चर्चा सुरू झाली आहे.

कोण आहेत भोले बाबा?

५८ वर्षीय भोले बाबा उर्फ नारायण साकार विश्व हरी यांचं खरं नाव सुरज पाल सिंह असं आहे. जवळपास ४० वर्षांपूर्वी ते उत्तर प्रदेश पोलिसांत हवालदार म्हणून रुजू झाले होते. १० वर्षं पोलिसांत नोकरी केल्यानंतर त्यांनी ही नोकरी सोडली. ९० च्या दशकात त्यांनी हाथरसमधील त्यांच्या मालकीच्या जमिनीवर मोठा आश्रम बांधला आणि तिथे अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यास सुरुवात केली. आसपासच्या गावांप्रमाणेच इतर राज्यांमधूनही त्यांच्या आश्रमात मोठ्या संख्येनं लोक येऊ लागले.

Hathras Stampede : चेंगराचेंगरीत ११६ जण ठार झाल्यानंतर भोले बाबा कुठे गेले? शोधमोहिमेनंतर पोलीस म्हणाले…

“पोलिसात १० वर्षं नोकरी केल्यानंतर त्यांनी नोकरी सोडली. त्यांचं शेवटचं पोस्टिंग आग्रा येथे होत”, अशी माहिती त्यांचा माग काढण्यासाठी त्यांच्या गावी गेलेल्या पोलिसांनी इंडियन एक्स्प्रेसला दिली.

भोले बाबा विवाहित, त्यांच्या पत्नी ‘माताश्री’ म्हणून परिचित!

भोले बाबा हे विवाहित असून त्यांना मूलबाळ नाही. त्यांनी पोलिसाची नोकरी सोडल्यानंतर ‘भोले बाबा’ हे नाव धारण केलं. त्यांच्या पत्नी ‘माताश्री’ या नावाने ओळखल्या जातात. त्यांचं मूळ गाव असलेल्या बहादूर नगरच्या सरपंच झफर अली यांनी ही माहिती दिली आहे. “ते सुखवस्तू कुटुंबात वाढले. तीन भावंडांपैकी ते दुसरे आहेत. त्यांच्या मोठ्या बंधूंचं काही वर्षांपूर्वी निधन झालं असून धाकटे बंधू आजूनही मूळ गावी कुटुंबासोबत शेती व्यवसाय करतात”, अशी माहिती अली यांनी दिली.

बोले बाबा यांचं पाच वर्षांपूर्वी गावातून पलायन?

दरम्यान, भोले बाबा यांनी पाच वर्षांपूर्वी त्यांच्या मूळ गावातून पलायन केल्याचा दावा अली यांनी केला आहे. “सुरज पाल सिंगनं पाच वर्षांपूर्वी गाव सोडलं. त्यांच्याविरोधात गावात काही कट-कारस्थान शिजतंय या संशयातून त्यांनी गाव सोडलं. आम्ही असं ऐकलंय की आता ते राजस्थानमध्ये राहतात. गेल्या वर्षी ते पुन्हा गावात आले होते. त्यांनी त्यांची मालमत्ता एका ट्रस्टच्या नावे केली. एक व्यवस्थापक त्यांच्या आश्रमाचं कामकाज पाहतो”, अशी माहितीही अली यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितली.