Hathras Stampede Updates : उत्तर प्रदेशातल्या हाथरस या ठिकाणी भोलेबाबांचा सत्संग आयोजित करण्यात आला होता. या सत्संगात चेंगराचेंगरी झाली. त्यात १२१ जणांचा बळी गेला आहे. तर अनेक लोक जखमी झाले आहेत. भोले बाबा हे हाथरस आणि आजूबाजूच्या परिसरात धर्मोपदेशक म्हणून प्रसिद्ध आहेत. तसंच, दीर्घकालीन आजार बरे करणे, लोकांच्या समस्यू दूर आदी गोष्टींमुळे त्यांच्याकडे अनुयायांची संख्या वाढत जातेय. त्यामुळे ते स्वतःला देवाचा दूतही मानतात. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील माहिती दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या भोले बाबांनी २००० साली असाच चमत्कार करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, तेव्हा त्यांना अटक करण्यात आली होती. मृत झालेल्या एका मुलीला जिवंत करण्यासाठी त्यांनी तिचा मृतदेह ठेवून घेतला होता. परंतु, नंतर हा खटला बंद करण्यात आला.

निवृत्त पोलीस अधिकारी, तेजवीर सिंग हे २००० साली शाहगंज, आग्राचे स्टेशन हाऊस ऑफिसर होते. ते म्हणाले, “सूरज पाल, २००-२५० लोकांसह स्मशानभूमीत पोहोचले. १६ वर्षीय मुलीचा मृतदेह तिच्या कुटुंबीयांनी येथे अंत्यसंस्कारासाठी आणला होता. सूरज पाल आणि इतरांनी कुटुंबाला अंतिम संस्कार करण्यापासून रोखले आणि त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला की तिला पुन्हा जिवंत केलं जाऊ शकतं.

ते पुढे म्हणाले, आरोपींनी जबरदस्तीने कुटुंबीयांकडून मृतदेह नेला. दरम्यान, पोलिसांना माहिती देण्यात आली. जेव्हा आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा सूरज पाल आणि त्यांच्या समर्थकांनी आमच्याशी वाद घातला. त्याने दावा केला की तो मुलीला जिवंत करू शकतो. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी पोलिस पथकावर दगडफेक सुरू केली. अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. आम्ही सूरज पाल आणि त्यात सामील असलेल्या इतरांना अटक केली.”

दलित कुटुंबे बनली अनुयायी

१९९० च्या दशकात उत्तर प्रदेश पोलीस खात्यातून बाहेर पडल्यानंतर कासगंज येथील कॉन्स्टेबल सूरज पाल हे स्वयंभू धर्मोपदेशक बनले. त्यांनी मोठ्या प्रमाणात अनुयायी गोळा केले. दलित कुटुंबे, मजूर, गवंडी, शेतमजूर, सफाई कर्मचारी, सुतार, चटई विक्रेत आदी आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या लोकांमध्ये या बाबांची चर्चा असते.

हेही वाचा >> Hathras Stampede : मृतांच्या शवविच्छेदन अहवालातून अनेक धक्कादायक खुलासे समोर; डॉक्टर म्हणाले, “छातीत..”

आज प्रलय येणार अन् खरंच प्रलय आला

भोले बाबाही दलित कुटुंबातील असल्याने लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात, असंही म्हटलं जातं. ते कोणतीही दक्षिणा किंवा प्रसाद मागत नाही. खोटं बोलू नका, मांस-मासे-अंडी खाऊ नका, मद्यपान करू नका, असं ते त्यांच्या अनुयायांना सत्संगातून सांगतात, अशी माहिती त्या सत्सांगाला गेलेल्या उर्मिला देवी यांनी दिली. त्या त्यांच्या बहीण तारामती यांच्याबरोबर सत्सांगाला गेल्या होत्या. “सत्संगाच्या शेवटी भोले बाबा म्हणाले की, आज प्रलय येणार आणि मग खरंच प्रलय आला” , अशी माहिती तारामती यांनी दिली. या सत्संगाला ४० ते ७० वयोगटातील नागरिक उपस्थित होते.

सेवेदार येतात अन् घेऊन जातात

हाथरस जिल्ह्यातील डोणकोली गावातील रहिवाशांच्या मते भोले बाबाचे प्रत्येक गावात १० ते १२ सेवेदार आहेत. “ते येतात आणि गावातल्या लोकांना सत्संगाची माहिती देतात आणि त्यांना कार-बसमधून कार्यक्रमस्थळी घेऊन जातात. त्यांचे अनेक अनुयायी गळ्यात त्यांचा फोटो असलेले पिवळे लॉकेट घालतात”, असं एका ग्रामस्थाने सांगितलं.

“भोले बाबांच्या पायाची धूळ अंगावर किंवा डोक्यावर लावली तर सर्व आजार बरे होतात, असा त्यांच्या अनुयायांचा विश्वास आहे”, अशी माहिती एकाने दिली. सत्संग कार्यक्रमातून भोले बाबा निघाले तेव्हा त्यांच्या पायाची माती डोक्याला लावण्याकरता गर्दी झाली होती. परिणामी चेंगराचेंगरी झाली.

हेही वाचा >> Hathras Stampede: हाथरस चेंगराचेंगरीत १२१ जणांचा बळी, भोले बाबांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “काही समाजकंटकांनी..”

सेवेदारांना असतो खास पोषाख

“२००१ मध्ये माझं लग्न झालं तेव्हा बाबा इतके प्रसिद्ध नव्हते. पण कालांतराने त्यांची लोकप्रियता वाढत गेली. तुम्ही सातवेळा त्यांच्या सत्संगाला उपस्थित राहिलात तर तुम्ही सेवेदार होऊ शकता. सेवेदाराचा खास ड्रेस असतो. स्त्रिया गुलाबी रंगाच्या साड्या नेसतात तर, पुरुषही गुलाबी रंगाचा गणवेश घालतात”, असं एका भक्ताने सांगितलं.

महिलांबरोबर चांगले आचरण

डेक्कन हेराल्डने दिलेल्या वृत्तानुसार, या गावातील महिलांनी सांगितलं की, “बाबांचे महिलांबरोबरचे आचरण चांगले होते. ते फक्त देवाशी संबंधित गोष्टी बोलतात.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hathras stampede bhole baba claimed he could revive dead can treat long term diseases sgk