Hathras Stampede Updates : उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे स्वयंघोषित धर्मगुरू भोले बाबाच्या सत्संगात झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर देशभरातून या सत्संगाचं आयोजन करणारे लोक आणि भोले बाबाविरोधात संतापाची लाट उसळली. त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेत एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले होते. एसयाटीच्या पथकाने तीन दिवसांचा तपास आणि तब्बल १२० हून अधिक लोकांच्या चौकशा केल्यानंतर एसआयटीने ३०० पानांचा अहवाल सादर केला आहे. या अहवालात दुर्घटनेची कारणं आणि दुर्घटनेला जबाबदार असलेल्या लोकांची नावं नमूद करण्यात आली आहेत. हा अहवाल हाती पडताच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अ‍ॅक्शन मोडवर आहेत. उत्तर प्रदेश सरकारने उपविभागीय दंडाधिकाऱ्यांसह सहा अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. सर्कल ऑफिसरसह, सिकंदरामाऊच्या तहसीलदारांचाही या निलंबित अधिकाऱ्यांमध्ये समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२ जुलै रोजी नारायण साकार उर्फ विश्व हरी उर्फ भोले बाबा या स्वयंघोषित धर्मगुरूने आणि त्याच्या अनुयायांनी हाथरस येथे सत्संगाचं आयोजन केलं होतं. स्वतः भोले बाबाने या सत्संगाच्या कार्यक्रमात प्रवचन दिलं. मात्र प्रवचन संपवून तो तिथून निघून जात असताना सत्संगाला आलेल्या भक्तांनी त्याला नमस्कार करण्यासाठी त्याच्या कारच्या दिशेने धाव घेतली. हजारो लोक एकाच वेळी त्याच्या कारच्या दिशेने धावू लागले आणि त्याच वेळी धक्काबुक्की आणि चेंगरांचेंगरी झाली. यात १२१ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांची संख्या अधिक होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hathras stampede case 6 officers suspended including sdm tehsildar circle after sit submits report yogi adityanath asc
Show comments