उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील पुलराई गावात एका सत्संगाच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन ११७ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये मोठ्या प्रमाणात महिलांसह लहान मुलांचाही समावेश आहे. या गावात आज (मंगळवार, २ जुलै) साकार विश्व हरी भोले बाबा नावाच्या एका व्यक्तीच्या अनुयायांनी संत्सग आयोजित केला होता. या कार्यक्रमाला भोले बाबा याने प्रवचन दिलं. या भोले बाबाला पाहण्यासाठी, त्याचं प्रवचन ऐकण्यासाठी त्याचे हजारो अनुयायी उपस्थित होते. यामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. या कार्यक्रमाला स्थानिक प्रशासनाने परवानगी देखील दिली होती. दरम्यान, सत्संग संपवून भोले बाबा तिथून निघत असताना त्याच्या अनुयायांनी गोंधळ केला. अनेकांनी त्याच्या दिशेने धाव घेतली. त्याचवेळी चेंगराचेंगरीची घटना घडली. ज्यामध्ये आतापर्यंत ११७ लोकांनी आपले प्राण गमावले आहेत.

दरम्यान, पुलराईत नेमकं काय घडलं याबाबत एका प्रत्यक्षदर्शीने माहिती दिली आहे. रामदास नावाच्या पीडित व्यक्तीने सांगितलं की “सत्संगाचं समापन झाल्यानंतर गुरुजी तिथून निघाले. त्यांची कार मंडपातून बाहेर निघत असताना लोकांनी त्यांना नमस्कार करण्यासाठी, पदस्पर्श करण्यासाठी त्यांच्या कारच्या दिशेने धाव घेतली. त्यातून ही चेंगराचेंगरीची घटना घडली.”

रामदास यांनी ‘आज तक’ला सांगितलं की मी माझ्या पत्नीला अलीगड येथील दवाखान्यात घेऊन गेलो होते. तिथून माघारी परतत असताना मी माझ्या पत्नीबरोबर भोले बाबांच्या सत्संगाच्या कार्यक्रमाला आलो. माझी पत्नी भोले बाबांची भक्त आह. इथे आल्यावर मी मंडपाच्या एका कोपऱ्यात सेवेकऱ्यांबरोबर बसलो होतो. माझी पत्नी मंडपात जाऊन इतर स्त्रियांबरोबर बसली होती. सत्संगाचं समापन झाल्यानंतर बाबांची कार तिथून निघत असताना लोकांनी त्यांच्या कारच्या दिशेने धाव घेतली आणि ही चेंगराचेंगरी झाली. मी माझ्या पत्नीला शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र ती कुठेच दिसली नाही. काही सेवेकऱ्यांनी सांगितलं की तिला रुग्णालयात नेलं आहे. मी आता रुग्णालयात जात आहे.

रामदास म्हणाले, “आम्ही मंडपाच्या एका कोपऱ्यात बसल्यामुळे आमच्या आसपास चेंगराचेंगरी झाली नाही. अचानक मोठा जमाव मंडपात एका जागेवरून दुसरीकडे धावताना आम्ही पाहिलं. अनेक एकरांवर पसरलेल्या मंडपात ही घटना घडली. तसेच या चेंगराचंगरीनंतर मंडपाच्या बाहेरच्या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.”

हे ही वाचा >> उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये धार्मिक कार्यक्रमात चेंगराचेंगरी; ८७ जणांचा मृत्यू; तीन चिमुकल्यांसह महिलांचाही समावेश

मृतदेहांचा खच पाहून पोलिसाला हृदयविकाराचा झटका

या सत्संगाच्या बंदोबस्तासाठी उत्तर प्रदेश पोलिसांची क्विक रिस्पॉन्स टीम (QRT) तैनात करण्यात आली होती. मात्र ही चेंगराचेंगरी आणि मृतदेहांचा खच पाहून क्यूआरटी पथकातील पोलीस शिपाई रवी यादव यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. रवी यादव मृतदेहांची व्यवस्था करत असताना त्यांनी एकाच वेळी इतके मृतदेह पाहिल्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यामध्ये घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.