पाच वर्षाचा उमरान दाकनिश हा सिरियामध्ये सुरू असलेल्या रक्तरंजित संघर्षाचा प्रतिक बनला आहे. त्याचा रक्तबंबाळ अवस्थेतील एक फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. या फोटोला हजारो लोकांनी शेअर केले असून यामुळे दोन गटातील संघर्षाचा बळी ठरलेल्या एका निष्पाप मुलाचा चेहरा सर्वांना धक्का देणारा ठरला आहे. सीरियातील अलेप्पो शहराजवळ हवाई हल्ल्यामध्ये एका इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्यामुळे उमरान गंभीर जखमी झाला होता. हा हवाई हल्ला कोणी केला आहे अजून स्पष्ट झालेले नाही.
उमरानचा हा फोटो अलेप्पो येथील एका डॉक्टरने काढला होता. उमरान बंडखोरांनी बळकावलेल्या अलेप्पो येथील एका उपनगरात राहतो. बुधवारी झालेल्या हवाई हल्ल्यात त्याचे घर नष्ट झाले आहे. बचावदलातील लोक उमरानला एका इमारतीच्या ढिगाऱ्याखालून काढत असल्याचा व्हिडिओ येथील मीडिया सेंटरने प्रसिद्ध केला आहे. ढिगाऱ्याखालून काढताना उमरान रडत नव्हता. त्याला हवाई हल्ल्यात अंशत: उदध्वस्त झालेल्या एका रूग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले. उपचारानंतर डॉक्टरांनी त्याला सोडून दिले. डॉक्टरांना त्याच्या आई-वडीलांबाबत काहीच माहिती नव्हते. दुसऱ्या एका व्हिडिओत उमरान एका ठिकाणी केशरी रंगाच्या खुर्चीवर रक्तबंबाळ अवस्थेत शांत बसल्याचे दिसून येतो. तो आपल्या डाव्या हाताने चेहऱ्यावरील रक्त पुसत असल्याचेही व्हिडिओत दिसून येते.
गेल्या काही दिवसांपासून अलेप्पो शहरात विद्रोही आणि सिरियाचे अध्यक्ष बशर अल असद व त्यांचा सहकारी देश रशिया यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांशी बोलून या युद्ध संघर्षावर त्वरीत मार्ग काढण्यात येईल असे रशियाच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे.