Pandit Vishnu Rajoria on 4 Children: मध्य प्रदेशच्या परशुराम कल्याण बोर्डाचे अध्यक्ष (कॅबिनेट दर्जा) पंडित विष्णू राजोरिया यांनी ब्राह्मण जोडप्यांना एक अजब आवाहन केलं आहे. चार मुलांना जन्म देणाऱ्या जोडप्यांना ते एक लाख रुपये रोख देणार आहेत. रविवारी इंदूरमधील एका कार्यक्रमात बोलत असताना राजोरिया यांनी ही घोषणा केली. ‘सध्या जोडप्यांचा कल एकच मुल जन्माला घालण्याकडे असतो, पण सनातन धर्माच्या रक्षणासाठी चार मुलांना जन्म घालावा’, अशी अपेक्षा राजोरिया यांनी यावेळी व्यक्त केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कॅबिनेट दर्जा प्राप्त असणारे राजोरिया म्हणाले की, परशुराम कल्याण मंडळाचा अध्यक्ष असलो तरी एक लाख रुपये रोख देण्याचा निर्णय मी माझ्या वैयक्तिक पातळीवर जाहीर करत आहे. या कार्यक्रमानंतर इंडिया टुडेशी बोलताना राजोरिया म्हणाले की, ब्राह्मण जोडप्यांनी चार मुलांना जन्म देणे आता काळाची गरज आहे. सनातन धर्माच्या रक्षणासाठी हे करावेच लागेल.

हे वाचा >> Yograj Singh: हिंदी ही ‘बायकी’ भाषा, बायकांना अधिकार देऊ नका; युवराज सिंगचे वडील योगराज सिंग पुन्हा बरळले

विष्णू राजोरिया पुढे म्हणाले, “युवक तक्रार करतात की, शिक्षण महाग झाले आहे. त्यामुळे युवा जोडपे एकाच मुलाला जन्म देऊन थांबतात. पण यामुळे अनेक अडचणी उत्पन्न होत आहेत. मी तरुण जोडप्यांना आवाहन करू इच्छितो की, त्यांनी कसेतरी दिवस काढावेत. पण मुलं जन्माला घालण्यात मागे राहू नये. ज्येष्ठांकडून तर काही अपेक्षा ठेवू शकत नाही. म्हणून मी तरुण जोडप्यांना आवाहन करत आहे. तरुणच आपल्या पुढच्या पिढ्यांचे संरक्षण करू शकतात, त्यामुळं त्यांनी चार मुलांना जन्म घालावा.”

या विधानाबाबत माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, मी केलेले आवाहन व्यक्तिगत पातळीवर आहे. त्याचा परशुराम कल्याण मंडळाशी काही संबंध नाही. मी एका सामाजिक कार्यक्रमात हे बोललो आहे. माझे विधान सामाजिक आहे. ब्राह्मण समाजातील मुलांना शिक्षण, प्रशिक्षण देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, हा विश्वास दिला गेला पाहीजे.

दरम्यान काँग्रेसचे नेते मुकेश नायक यांनी मात्र राजोरिया यांनी आपल्या विधानाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी केली. “ते एक विद्वान व्यक्ती असून माझे मित्र आहेत. लोकसंख्येची भरमसाठ वाढ हा जगभरात चिंतेचा विषय ठरत आहे. जेवढी कमी लोकसंख्या असेल, तेवढ्या अधिक शैक्षणिक सुविधा देता येतील. मुस्लिमांची संख्या हिंदूंपेक्षा अधिक होईल, असा भ्रामक विचार पसरवला जात आहे.

दुसरीकडे भाजपानं मात्र राजोरिया यांच्या विधानापासून अंतर राखले आहे. पक्षाच्या वतीने सांगण्यात आले की, भाजपा सरकार नियम आणि संविधानानुसार काम करत आहे. राजोरिया जे काही म्हणाले, ते त्यांचे व्यक्तिगत मत होते. मुलांना जन्म देणे हा सर्वस्वी निर्णय जोडप्यांचा असतो. पक्षाचा याच्याशी काही संबंध नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Have four children get rs one lakh says madhya pradesh brahmin board chief pandit vishnu rajoria to couples kvg