CM Chandrababu Naidu : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी एका कार्यक्रमात बोलताना राज्यातील वृद्धांची वाढती लोकसंख्या लक्षात घेता जोडप्यांना अधिक मुले जन्माला घालण्याचा सल्ला दिला आहे. तसेच चंद्राबाबू नायडू यांनी यावेळी वृद्धांच्या वाढत्या संख्येवर चिंता व्यक्त करत वृद्धांची संख्या वाढण्याचा धोकाही नमूद केला. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी विशेषतः दक्षिणेकडील राज्यामधील कुटुंबांना अधिक मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले आहे.

मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी म्हटलं की, “लोकसंख्या घटणे आणि तरुणांचे स्थलांतर राज्यासाठी धोकादायक ठरू शकते. लोकसंख्या व्यवस्थापन अंतर्गत कायदा आणण्याचाही विचार सुरु असून यामध्ये मोठ्या कुटुंबांना प्रोत्साहन देण्याचा विचार आहे. अधिक मुले असलेल्या कुटुंबांना आम्ही प्रोत्साहन देण्याचा विचार करत आहोत. जोडप्यांना अधिक मुले जन्माला घालण्यासाठी प्रोत्साहित करत आहोत. दोनपेक्षा जास्त अपत्ये असलेल्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यास प्रतिबंध करणारा पूर्वीचा कायदा आम्ही रद्द केला आहे. दोनपेक्षा जास्त मुले असलेल्या लोकांनाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवता याव्यात, यासाठी सरकार कायदा आणण्याचा विचार करत आहे”, असं चंद्राबाबू नायडू यांनी म्हटलं. यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

हेही वाचा : “अयोध्येचा निकाल देण्यापूर्वी देवासमोर बसलो अन्…”, सरन्यायाधीश चंद्रचूडांनी सांगितला ‘तो’ किस्सा

दरम्यान, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी असंही सांगितलं की, “कुटुंबांना प्रोत्साहन देऊन लोकसंख्येच्या असमतोलाची समस्या सोडवता येऊ शकते. अधिक मुले असलेल्या कुटुंबांना लाभ देण्याची तयारी सरकार करत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील खेडे गावांमध्ये केवळ वृद्ध लोक आहेत. कारण तरुण पिढी देशाच्या विविध भागात आणि परदेशात स्थलांतरित झाले आहेत. सरकार विचार करत असलेल्या कायद्यामुळे मोठ्या कुटुंबांना निवडणूक लढवण्याची संधी मिळेल. तसेच त्यामुळे लोकसंख्या वाढीस चालना मिळेल.”

चंद्राबाबू नायडू यांनी पुढे म्हटलं की, “राज्यातील प्रजनन दर १.६ वर आला आहे. जो राष्ट्रीय सरासरी २.१ पेक्षा खूपच कमी आहे. ही परिस्थिती दक्षिणेकडील राज्यांना वृद्ध लोकसंख्येच्या समस्येत ढकलू शकते. या दिशेने पावले न उचलल्यास आंध्र प्रदेशला जपान आणि युरोपसारख्या परिस्थितीला सामोरे जावं लागेल”, अशी चिंता चंद्राबाबू नायडू यांनी व्यक्त केली.

दरम्यान, चंद्राबाबू नायडू यांनी २०१८ मध्येही अशाच प्रकारचं आवाहन केलं होतं. त्यानंतर त्यांनी राज्यातील वृद्ध लोकसंख्येच्या समस्येबद्दल चेतावणी दिली होती आणि कुटुंबांना अधिक मुले जन्माला घालण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी सुचवलं होतं. त्यांनी आंध्र प्रदेशातील लोकसंख्येतील घट आणि तेलंगणाच्या निर्मितीनंतर झालेल्या लोकसंख्या बदलांवरही भाष्य केलं होतं. दरम्यान, आता अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील जनजीवन आणि विकास प्रभावित होऊ शकतो. त्यामुळे कुटुंबांना प्रोत्साहन देऊन हा प्रश्न सुटू शकतो, असं मत चंद्राबाबू नायडू यांनी व्यक्त केलं आहे.