Baba Ramdev on Sharbat Jihad: बाबा रामदेव यांनी काही दिवसांपूर्वी पतंजलीच्या गुलाब सरबत या नव्या उत्पादनाची जाहिरात करत असतान बाजारात उपलब्ध असलेल्या सरबताच्या ब्रँड्सवर टीका केली होती. या ब्रँड्सच्या वस्तू घेतल्यामुळे त्यातून होणारा नफा मशिदी आणि मदरश्यांकडे जातो, असा दावा करताना त्यांनी यास ‘सरबत जिहाद’ असे नाव दिले होते. या विषयावर आता वाद उफाळल्यानंतर बाबा रामदेव यांनी आपल्या विधानाचे समर्थन केले आहे. तसेच आपण कोणत्याही ब्रँड्सच्या नावाचा उल्लेख केला नव्हता, असेही स्पष्टीकरण दिले.
बाबा रामदेव म्हणाले, “मी कुणाचेही नाव घेतली नव्हते. तरीही रूह अफ्जाला समर्थन करणाऱ्या लोकांनी सरबत जिहाद शब्द ओढवून घेतला. याचा अर्थ ते जिहाद करत आहेत, हे त्यांना मान्य आहे.”
ते पुढे म्हणाले, “जर त्यांची निष्ठा इस्लामशी असेल आणि त्यांना मदरशे आणि मशिदी बांधण्यात रस असेल तर त्यांनी आनंद मानायला हवा. तथापि, सनातन्यांनी हे समजून घेतले पाहिजे की, ते कुणाच्या बाजूने आहेत. सनातनचा गौरव कुणामुळे वाढतोय, हे लक्षात घेतले पाहिजे. सरबत जिहाद होतो आहे, हे मी पुन्हा सांगतो.”
बाबा रामदेव यांनी पतंजलीच्या उत्पादनाची जाहिरात करण्यासाठी फेसबुक पेजवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये त्यांनी बाजारात उपलब्ध असलेल्या काही सरबताच्या ब्रँडवर टीका केली होती. या ब्रँडच्या वस्तू विकून जो नफा मिळतो, तो मशीद आणि मदरशे उभारण्यासाठी वापरला जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यांच्या विधानावर काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी आक्षेप घेतला. तसेच भोपाळ मधील टीटी नगर पोलीस ठाण्यात जाऊन रामदेव बाबा यांच्या विरोधात धार्मिक द्वेष पसरविल्याच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली.
मध्य प्रदेशचे राज्यसभा खासदार यांनी त्यांच्या तक्रारीत भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम १९६ (१) (अ) आणि २९९ नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलमही दाखल करण्याची मागणी केली आहे. रामदेव बाबा यांनी पतंजलीच्या गुलाब सरबतची जाहिरात करत असताना रूह अफ्जा ब्रँडवर नाहक टीका केली, असा आरोप करण्यात आला.
रामदेव बाबा यांच्या अधिकृत सोशल मिडिया हँडलवर सदर व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. पतंजलीच्या उत्पादनांचा खप वाढविण्यासाठी रामदेव बाबा सांप्रदायिक भावना भडकविण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप त्यांच्यावर केला गेला. दिग्विजय सिंह पुढे म्हणाले की, धर्म आणि राष्ट्रवादाचा वापर करून रामदेव बाबा यांनी एक मोठे व्यावसायिक साम्राज्य उभे केले. त्यांची अनेक उत्पादने गुणवत्ता मानके पूर्ण करण्यात अयशस्वी ठरलेली आहेत. त्यामुळे न्यायालयानेही त्यावर बंदी घातली आहे.
रामदेव बाबा यांनी कुणाचे नाव घेतले नसले तरी त्यांनी हमदर्द कंपनीकडे बोट दाखवले हे संपूर्ण देशाला माहीत आहे. एखाद्या कंपनीचा मालक मुस्लिम आहे म्हणून त्यांच्या उत्पादनाला विरोध करणे, त्याविरोधात द्वेषपूर्ण बोलणे योग्य नाही, असेही दिग्विजय सिंह म्हणाले.