हत्या करण्यात आलेला हेवूड ब्रिटिश गुप्तहेर
चीनमधील कम्युनिस्ट पक्षातून पायउतार झालेले बो झिलाई यांच्या कुटुंबाचे आंतरराष्ट्रीय पडसाद उमटवणारे हत्या प्रकरण वेगळ्या वळणापाशी येऊन थांबले आहे. झिलाई यांच्या पत्नी ग्यु कैलाई यांनी हत्या केलेला ब्रिटिश नागरिक निल हेवूड हा ब्रिटिश गुप्तचर संघटना एम- १६ चा हेर असल्याचे नवे सत्य समोर आले आहे. ब्रिटिश उद्योजक म्हणून आपली प्रतिमा निर्माण करून चीनमध्ये बो झिलाई यांच्यासोबत हेवूडने कम्युनिस्ट पक्षातील विविध अधिकाऱ्यांशी संधान बांधले. याशिवाय ‘एम- १६’ ला तो विविध माहिती पुरवत असे, असे ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने मंगळवारी उघड केले. चीनमध्ये ८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सत्तांतराच्या बैठकीच्या पाश्र्वभूमीवर हा रहस्यभेद बो यांच्या गुन्ह्य़ांची पातळी वाढविणारा ठरणार आहे. कम्युनिस्ट पक्षाचे माजी नेते असलेले बो यांच्यावर भ्रष्टाचारासह विविध खटले प्रलंबित आहेत.     

प्रकरण काय?
बो झिलाई यांच्या पत्नी ग्यु कैलाई यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये ब्रिटिश उद्योजक निल हेवूड याची हत्या केली. या हत्येप्रकरणी दोषी ठरविण्यात आलेल्या कैलाई यांना शिक्षाही सुनावण्यात आली आहे. हेवूड हा १९९० पासून झिलाई यांच्या कुटुंबाशी परिचित होता. झिलाई यांच्या लंडनमध्ये शिकत असलेल्या मुलाची देखरेखही त्याच्याकडून होत होती. मात्र काही वर्षांपासून झिलाई कुटुंब आणि हेवूड यांच्या संबंधांमध्ये बाधा आली. त्याचा परिणाम हेवूड यांच्या हत्येत झाला, असे मानले जाते.  

गूढ काय?
हेवूड यांचा मृत्यू गूढ प्रकरण म्हणून समोर आला होता. बेताल मद्यप्राशनामुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सुरुवातीला सांगण्यात आले. त्यानंतर पत्नीच्या संमतीने त्यांचे शवविच्छेदन न करता अंत्यसंस्कार करण्यात आले. जानेवारी महिन्यामध्ये या मृत्यूबाबतचे गूढ वाढू लागले.पुढच्याच महिन्यामध्ये चोंगकिंग येथील माजी पोलीस प्रमुख वँग लिजून यांनी चेंगडूमधील अमेरिकी राजदूतांना हेवूड यांची हत्या झाली असून ती कैलाई यांनी केल्याचे उघड केले.  

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रकरणात नवे काय?
वॉल स्ट्रीट जर्नलने विविध ब्रिटिश अधिकारी आणि हेवूड यांच्या मित्रांची चौकशी केल्यावर, हेवूड सातत्याने बो यांच्या संदर्भातील माहिती एम-१६ ला पुरवीत असे, असे समोर आले आहे. एम-१६ च्या माजी अधिकाऱ्यांनी उभारलेल्या ‘हक्ल्युत’ या संस्थेसाठी तो काम करीत होता. मात्र ब्रिटिश परराष्ट्र सचिव हेग यांनी या वृत्ताचा इन्कार केला आहे. हेवूड हा ब्रिटिश सरकारच्या कुठल्याही संस्थेशी कार्यरत नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले. ब्रिटिश उच्चायुक्ताच्या प्रवक्त्याने गुप्तचर यंत्रणेशी संबंधित कोणत्याही गोष्टीविषयी बोलण्यास नकार देत, या प्रकरणावर मौन पाळणे पसंत केले. हेवूडला जेम्स बॉण्डचे जबरदस्त आकर्षण होते, त्याच्या गाडीचा नंबरही त्याने ००७  मिळविला होता. त्यावरून त्याचे गुप्तचर संघटनांशी असलेले लागेबंधे स्पष्ट होत असल्याचे हेवूडच्या मित्रांचे म्हणणे आहे.