स्वयंघोषित संत आसाराम बापू यांची जामीन याचिका सोमवारी राजस्थान उच्च न्यायालयाने फेटाळली. अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून आसाराम बापू सध्या अटकेत आहेत. याआधीही त्यांची जामीन याचिका राजस्थान उच्च न्यायालयाने फेटाळली होती.
राजस्थान उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जीत कौर यांनी हा निकाल दिला. आसाराम बापूंची बाजू मांडणारे प्रख्यात विधिज्ञ राम जेठमलांनी यांनी केलेले युक्तिवाद न्यायालयाने फेटाळून लावले. पीडित मुलीने आसाराम बापूंवर लावलेल्या आरोपांवरही जेठमलांनी यांनी प्रश्न उपस्थित केले. पीडित मुलगी स्वतःहून आसाराम बापूंच्या आश्रमात आली होती. त्याचबरोबर गेल्या काही महिन्यांपासून आसाराम बापू अटकेत आहेत. त्यांची तब्येतही खालावली आहे. त्यामुळे त्यांना जामीन देण्यात यावा. मात्र, पीडित मुलीने केलेले आरोप आरोपपत्रामुळे अधिक गंभीर बनले आहेत, याकडे सरकारी पक्षाने न्यायालयाचे लक्ष वेधले.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्या. कौर यांनी गेल्या सोमवारी आपला निर्णय राखून ठेवला होता. तो सोमवारी देण्यात आला आणि आसाराम बापूंचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला.

Story img Loader