कर्नाटकमध्ये बजरंग दलाच्या २३ वर्षीय कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे. रविवारी रात्री शिवमोग्गा जिल्ह्यात हर्षा नावाच्या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. हत्येनंतर परिसरात तणाव असून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. हर्षाला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं होतं, मात्र त्याला मृत घोषित करण्यात आलं. सोशल मीडियावर हिजाबसंबंधी पोस्ट टाकल्यामुळे ही हत्या केल्याचं म्हटले जात आहे. मात्र कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी सध्या राज्यात सुरु असलेल्या हिजाब वादाशी याचा काही संबंध नसल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर हर्षाच्या भावाने यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.
बजरंग दलाचा कार्यकर्ता हर्षाचा भाऊ प्रवीण याने सोमवारी सांगितले की, त्याच्या भावाची हत्या हिंदूंचा विचार केल्यामुळे झाली आहे. “माझा भाऊ संघटनेचा सक्रिय सदस्य होता. त्याने फक्त हिंदूंचा विचार केला आणि त्यामुळेच त्याची हत्या झाली. काल रात्री आम्हाला कळवण्यात आले की त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आम्हाला दोषींवर कठोर कारवाई हवी आहे,” असे प्रविणने म्हटले आहे.
कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी आम्हाला पुढील तपासाची प्रतीक्षा करावी लागेल, असे कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी म्हटले होते. “रविवारी रात्री ९.३० वाजता हत्या झाली. पोलिसांना काही पुरावे सापडले आहेत. आम्ही लवकरच आरोपींना अटक करु. या हत्येचं नेमकं कारण काय याची माहिती अद्याप मिळालेली नाही. शिवमोग्गा राखीव पोलिसांना पाठवलं जात आहे,” असं त्यांनी सांगितलं.
कर्नाटकातील शिवमोग्गा जिल्ह्यात रविवारी हर्षा (२३) या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती. हत्येनंतर शिवमोग्गा येथे जाळपोळ आणि दगडफेकीच्या काही घटना घडल्या. दुचाकी जाळण्यात आल्या आणि घरे आणि दुकानांवर दगडफेक करण्यात आली. तिथे सुरू असलेल्या अशांततेमुळे परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे.
दरम्यान, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जेडीएस नेते एचडी कुमारस्वामी म्हणाले की, अशी घटना घडू शकते असा इशारा त्यांनी आधीच दिला होता. “गेल्या आठवड्यात मी म्हटलं की असं होऊ शकतं, आता एका तरुणाची हत्या झाली आहे. काँग्रेस आणि भाजपा आता आनंदी होऊ शकतात कारण त्यांनी राज्यातील शांतता भंग केली आहे, असे कुमारस्वामी म्हणाले.
बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या म्हणाले की, सरकारने मारेकऱ्यांचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी. ही हत्या त्यांच्या झाली असल्याने गृहमंत्र्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा, असे ते म्हणाले.