मात्र, पश्चात्ताप नाहीच
जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेचा अतिरेकी अफजल गुरू याला २००१ मधील संसद हल्ल्याच्या प्रकरणात आज सकाळी फाशी देण्यात आली, परंतु वधस्तंभाकडे जाण्यापूर्वी त्याला कुठलाही पश्चात्ताप झाल्याचे दिसत नव्हते. तिहार तुरुंगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, अंतिम क्षणी अफजल गुरू अतिशय शांत होता, त्याला कसलाही पश्चात्ताप झालेला दिसला नाही.
अफजल गुरूला तुरुंग क्रमांक ३ मध्ये ठेवले होते, तेथे त्याला काल सायंकाळी शनिवारी फाशी देणार असल्याची कल्पना देण्यात आली त्या वेळी तो काहीसा चरकला. अफजल गुरू हा उत्तर काश्मीरमधील सोपोर येथील रहिवासी होता. अत्यंत गुप्तपणे त्याला तिहारमधील तुरुंग क्रमांक ३ मध्ये सकाळी आठ वाजता फाशी देण्यात आली. दंडाधिकारी, डॉक्टर व वरिष्ठ तुरुंग अधिकारी त्याच्या फाशीच्या वेळी उपस्थित होते. आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले की, गुरूला सकाळी पाच वाजता उठवण्यात आले व नंतर चहा देण्यात आला. त्याने नमाज पठणही केले. सकाळी साडेसात वाजता त्याला वधस्तंभाकडे नेण्यात आले.
शेवटी त्याला काही पश्चात्ताप झाल्याचे दिसून आले काय, असे विचारले असता तुरुंग महासंचालक विमला मेहरा यांनी सांगितले की, अफजल गुरू आनंदात व व्यवस्थित होता. अफजल गुरू याला फाशी देण्याअगोदर त्याची डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी केली होती. मेहरा यांनी सांगितले की, फाशीपूर्वी केल्या जाणाऱ्या सर्व प्रक्रिया पार पाडण्यात आल्या आहेत. अफजल गुरूचा मृतदेह तुरुंगाच्या आवारातच दफन करण्यात आला. त्याला तुरुंग क्रमांक ३ मध्ये दफन करण्यात आले, असे तिहार तुरुंगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मौलवींनी त्याच्यावर धार्मिक संस्कारही केले. त्याची अंतिम इच्छा काय होती किंवा शेवटी त्याचे शब्द काय होते, याविषयी काही सांगण्यास तुरुंग अधिकाऱ्यांनी नकार दिला.
अफजल गुरूचे कुटुंबीय उत्तर काश्मीरमधील सोपोर येथे राहतात. त्यांना दयेची याचिका फेटाळल्याची माहिती देण्यात आली होती. गुरूचे वकील नंदिता हक्सर व एन. पंचोली यांना मात्र सरकारने हा निर्णय कळवला नव्हता, असा दावा केला आहे. अफजल गुरूला फाशी देण्यात आल्याचे त्याच्या कुटुंबीयांना वृत्तवाहिनीवरूनच कळाले, असे या वकिलांनी सांगितले. ते म्हणाले की, गुरूच्या कुटुंबीयांना या निर्णयाची काहीच माहिती नव्हती. त्यांना वृत्त वाहिन्यांवरून समजले. संचारबंदीमुळे ते येऊ शकले नाहीत.

अखेरच्या क्षणीही निर्विकार
अफझल गुरूला फाशी देण्याच्या ठिकाणी नेताना तो अत्यंत शांत आणि निर्विकार होता. गेल्या १० वर्षांपासून तिहार कारागृहात असलेल्या अफझलला आपला अखेरचा क्षण जवळ येत असल्याचे दिसत होते तरी भीतीचा लवलेश अथवा केलेल्या कृत्याची खंतही त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हती, असे तिहार कारागृहातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

जल्लोष.. आक्रोश.. संताप..
अफजल गुरूला फाशी दिल्याचे समजताच एकीकडे देशभरात जल्लोषाचे वातावरण होते तर अफजल समर्थक विद्यार्थी संघटनेत आक्रोश आणि संतापाचे वातावरण होते.

स्पीड पोस्टद्वारे कुटुंबीयांना निर्णयाची  माहिती
अफझल गुरूला फासावर लटकविल्याचे वृत्त त्याच्या कुटुंबीयांना स्पीड पोस्टद्वारे कळविण्यात आले आणि त्यापूर्वी जम्मू आणि काश्मीर सरकारला विश्वासात घेण्यात आले, असे शनिवारी केंद्र सरकारने स्पष्ट केले.
  तिहार कारागृहातील अधिकाऱ्यांनी स्पीड पोस्टद्वारे गुरूच्या कुटुबीयांना कळविले. हे रजिस्टर पत्र गुरूच्या कुटुंबीयांना मिळाले का, त्याची खातरजमा करून घेण्यास जम्मू-काश्मीर पोलीस महासंचालकांना सांगण्यात आले होते, असे केंद्रीय गृहसचिवांनी स्पष्ट केले.

घटनाक्रम
१३ डिसेंबर २००१- पाच सशस्त्र अतिरेकी संसद संकुलात घुसले व त्यांनी अंदाधुंद गोळीबार केला, त्यात सुरक्षा जवानांसह ९ ठार, १५ जखमी.
१५ डिसेंबर २००१- दिल्ली पोलिसांनी जम्मू व काश्मीरमधून जैश ए महंमदचा अतिरेकी अफजल गुरू याला ताब्यात घेतले. दिल्ली विद्यापीठाच्या झाकीर हुसेन कॉलेजचे एस.ए.आर. गिलानी जाबजबाबासाठी ताब्यात. नंतर अटक. अफसान गुरू व तिचा पती शौकत हुसेन गुरू यांनाही ताब्यात घेतले.
२९ डिसेंबर २००१- अफजल गुरू याला दहा दिवसांची पोलीस कोठडी.
४ जून २००२- अफजल गुरू, एस.ए.आर गिलानी, शौकत हुसेन गुरू व अफसान गुरू  यांच्यावर आरोप निश्चित.
१८ डिसेंबर २००२- एस.ए.आर गिलानी, शौकत हुसेन गुरू व अफजल गुरू यांना फाशीची शिक्षा, तर अफसान गुरू आरोपमुक्त.
३० ऑगस्ट २००३- जैश ए महंमदचा नेता गाझी बाबा हा या हल्ल्यातील प्रमुख आरोपी होता. तो श्रीनगर येथे सीमा सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत मारला गेला. दहा तासांच्या चकमकीत इतर तीन अतिरेकीही ठार.
२९ ऑक्टोबर २००३- गिलानी याची खटल्यातून सुटका.
४ ऑगस्ट २००५- सर्वोच्च न्यायालयात अफजल
    गुरूच्या फाशीवर शिक्कामोर्तब. शौकत हुसेन गुरूची
फाशी रद्द, त्याऐवजी १० वर्षे सश्रम कारावास.
२६ सप्टेंबर २००६- दिल्ली न्यायालयाने अफजल गुरूच्या फाशीचा आदेश दिला.
३ ऑक्टोबर २००६- अफजल गुरूची पत्नी तब्बसूम गुरू हिने राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्याकडे दयेचा अर्ज केला.
१२ जानेवारी २००७- सर्वोच्च न्यायालयाने अफजल गुरूची फाशीच्या शिक्षेच्या फेरआढाव्याची याचिका फेटाळली.
१९ मे २०१०- दिल्ली सरकारने अफजल गुरूची दयेची याचिका फेटाळली व फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले.
३० डिसेंबर २०१०- शौकत हुसेन गुरू याची दिल्लीच्या तिहार तुरुंगातून सुटका.
१० डिसेंबर २०१२- गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी अफजल गुरूच्या फाइलवर हिवाळी अधिवेशनानंतर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
३ फेब्रुवारी २०१३- राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अफजल गुरूची दयेची याचिका फेटाळली.
९ फेब्रुवारी २०१३- अफजल गुरूला तिहार तुरुंगात फाशी.