देशात तिसऱ्या टप्प्यातल्या करोना प्रतिबंधक लसीकऱणाला सुरुवात झाली आहे. मात्र, लसींच्या तुटवड्यामुळे अनेक ठिकाणचं लसीकरण थांबलं आहे, तर अनेक ठिकाणी लसीकऱण अद्याप सुरु झालेलं नाही. केंद्राकडून होणारा पुरवठा अपुरा असल्याची खंत अनेक राज्यांनी बोलून दाखवली आहे. आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लसींच्या पुरवठ्यांची आकडेवारी जाहीर केली आहे.
भारत सरकारने आत्तापर्यंत १७.३५ कोटींहून अधिक लसींचे डोस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना मोफत पुरवल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. ९० लाखांहून अधिक डोस अजूनही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे पाठवायचे आहेत. तसंच पुढच्या तीन दिवसांमध्ये १० लाखांहून अधिक डोस त्यांच्यापर्यंत पोहोचणार असल्याचंही आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे.
दरम्यान, लसींच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे अनेक राज्यांकडून केंद्र सरकारवर टीका केली जात आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर करोना लसीकरणाच्या धोरणावरुन टीका केलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अद्याप लसीकरणाच्या मुद्दयावरील माझ्या पत्राला उत्तर दिलेलं नाही, असे ममता यांनी गुरूवारी सांगितलं.