केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने भारतात राहणाऱ्या परदेशी नागरिकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. विदेशी नागरिकांना करोनावरील लसीसाठी कोविन पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्यास मंजुरी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रजिस्ट्रेशनसाठी परदेशी नागरिक पासपोर्टचा ओळखपत्र म्हणून वापर करू शकणार आहेत. पोर्टलवर रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यांना लसीकरणाचा स्लॉट मिळणार आहे.
देशात आतापर्यंत ५१ कोटी लोकांचं लसीकरण करण्यात आलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे. भारताला १० कोटी लोकांचं लसीकरण करण्यासाठी ८५ दिवसांचा अवधी लागला होता. त्यानंतर ४५ दिवसात २० कोटींचं लक्ष्य गाठलं. तर ३० कोटींचं लक्ष्य गाठण्यासाठी २९ दिवसांचा अवधी लागला. त्यानंतर २४ दिवसात ४० कोटींचं लक्ष्य गाठलं. आता मागच्या २० दिवसात ५० कोटींचं लक्ष्य गाठण्यात यश आलं आहे.
Health Ministry has decided to allow foreign nationals residing in India to get registered on CoWin portal to take COVID vaccine. They can use their passport as ID for registration on CoWIN. Once they’re registered on this portal, they’ll get a slot for vaccination: Govt of India pic.twitter.com/f9djEZTxoE
— ANI (@ANI) August 9, 2021
देशात लसीकरण मोहिमेला १६ जानेवारीपासून सुरुवात झाली होती. सुरुवातील आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली होती. त्यानंतर २ फेब्रुवारीपासून दुसऱ्या टप्प्यातील कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. १ मार्च पासून ६० वर्षांवरील लोकांचं लसीकरण करण्याची मोहिम सुरु झाली. १ एप्रिलपासून ४५ वर्षावरील लोकांना लस देण्याची घोषणा करण्यात आली. १ मे पासून १८ वर्षावरील सर्वांना लस देण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत आपत्कालीन वापरासाठी सीरम इन्स्टिट्यूट उत्पादित अॅस्ट्राझेनेका- कोव्हिशिल्ड, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन, रशियाची स्पुटनिक, मॉडर्ना आणि आता जॉन्सन अँड जॉन्सन या लशींना परवानगी देण्यात आली आहे.
‘मोहरम’ संदर्भात गृह विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी
देशात करोनाची तिसरी लाट लवकरच येणार असल्याचा इशारा आरोग्य तज्ज्ञांनी दिलाय. तिसऱ्या लाटेची चाहूल असली तरी गेल्या २४ तासांत करोना रुग्णसंख्या कमी झाली आहे. रविवारी देशात ३५ हजार ४९९ नवीन रुग्ण आढळले असून ४४७ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर ३९ हजार ६८६ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात करोनाची रुग्णसंख्या ९ टक्क्यांनी कमी झाली आहे.