१६ आमदारांच्या अपात्रतेवर विधानसभा अध्यक्षांनी तातडीने निर्णय घ्यावा, त्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालायने अध्यक्षांना तसे आदेश द्यावेत, यासाठी ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर कोणत्याही क्षणी निकाल येण्याची शक्यता आहे. शुक्रवारी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांची कानउघाडणी केली होती. तसंच, सुनावणीचं सुधारित वेळापत्रकही सादर करण्यास सांगण्यात आले होते. परंतु, विधानसभा अध्यक्षांकडून जुनंच वेळापत्रक सादर केलं जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राहुल नार्वेकरांनी आज प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राहुल नार्वेकर म्हणाले की, “काही वेळातच या संदर्भातील सुनावणी होणार आहे. विधिमंडळाची भूमिका, विधानसभा अध्यक्षांची भूमिका सर्वोच्च न्यायालयात मांडण्यात येणार आहे. नेमकं नियमबाह्य, घटनाबाह्य कोणतं कृत्य झालंय तेच समजलं नाहीतर पुढची कारवाई कशी होईल, सुनावणी झाल्यानंतरच याबाबत स्पष्टता येईल.”

दुपारी होणार सुनावणी!

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयातील आजच्या कामकाजानुसार दुपारी १२ किंवा एकच्या सुमारास शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर सुनावणीतील दिरंगाईच्या प्रकरणाच्या याचिका सुनावणीसाठी घेतल्या जातील. न्यायालयाच्या वेळापत्रकामध्ये हे प्रकरण २४व्या क्रमांकावर आहे.

हेही वाचा >> सर्वोच्च न्यायालयाने राहुल नार्वेकरांना फटकारलं, वाचा नेमकं काय म्हणाले सरन्यायाधीश!

सुधारित वेळापत्रक दिल्यानंतर पुढील अंदाज..

यासंदर्भात ज्येष्ठ वकिल उज्ज्वल निकम यांनी टीव्ही ९ शी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. “सर्वोच्च न्यायालयात पहिला मुद्दा असेल की विधानसभा अध्यक्षांनी सुधारित वेळापत्रक द्यावं. कारण याआधीच्या वेळापत्रकानुसार सुनावणीला बराच कालावधी लागू शकतो. आज अध्यक्ष सुधारित वेळापत्रक देण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार तातडीने सुनावणी घ्या याचा अर्थ न्याय फक्त दिला नाही तर तो दिल्यासारखा वाटला पाहिजे असाही आहे. त्यामुळे त्यानुसार वेळापत्रक तयार करावं लागेल”, असं उज्ज्वल निकम म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hearing on mla disqualification in supreme court soon rahul narvekar says sgk