पीटीआय, नवी दिल्ली

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वैद्याकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या ‘नीट-यूजी’ २०२४ परीक्षांसंबंधी विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार आहे. देशभरात ५ मे रोजी ‘नीट-यूजी’ची प्रवेश परीक्षा झाली होती, त्यामध्ये प्रश्नपत्रिका फुटणे, परीक्षार्थींना गुण वाढवून देणे आणि तोतयागिरी यासह गैरप्रकार झाल्याचे आरोप करणाऱ्या ४०पेक्षा जास्त याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. त्या सर्व याचिकांवर सोमवारी एकत्रित सुनावणी होईल.

या सुनावणीपूर्वी, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत ‘नीट-यूजी’चे ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ने शहरनिहाय आणि केंद्रनिहाय निकाल शनिवारी आपल्या संकेतस्थळांवर जाहीर केले. त्यातील तपशिलांनुसार, भरघोस मिळाल्यानंतर फेरपरीक्षा द्यावी लागलेल्या विद्यार्थ्यांची कामगिरी तितकीशी चांगली नसल्याचे आढळले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर अपलोड केलेल्या सूचीनुसार, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. जे बी पारडीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होईल. ‘नीट-यूजी’ २०२४ प्रवेश परीक्षा रद्द करा, फेरपरीक्षा घ्या अशा मागण्या या याचिकांमध्ये करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा >>>US President Joe Biden withdraws from US presidential election race: जो बायडेन यांची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार

विद्यार्थी आणि पालकांनी केलेल्या याचिकांबरोबर ‘एनटीए’नेही याचिका दाखल करून विविध उच्च न्यायालयांतील याचिका सर्वोच्च न्यायालयात वर्ग करण्याची मागणी केली आहे. ‘यूजीसी-नेट’ परीक्षा रद्द करण्याच्या केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. ‘नीट-यूजी’ परीक्षेपाठोपाठ याही परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या संशयावरून ती परीक्षेच्या आदल्या दिवशी, म्हणजे १९ जूनला रद्द करण्यात आली होती. त्यापाठोपाठ सरकारने याचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचीही घोषणा केली. या याचिकेवरही सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर सोमवारीच सुनावणी होण्याची शक्यता आहे. ही याचिका अॅड. उज्ज्वल गौर यांनी दाखल केली आहे. सीबीआय तपास पूर्ण होईपर्यंत ‘यूजीसी-नेट’ फेरपरीक्षेवर स्थगिती आणावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hearing on neetug petitions today there is also a demand for postponement of ugcnet reexamination amy