राष्ट्रवादी पक्ष कोणाचा? राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह कोणाचे? याप्रश्नी निवडणूक आयोगात प्रकरण दाखल झाले आहे. जुलैमध्ये अजित पवार गटाने पक्षासाठी निवडणूक आयोगात धाव घेतली. त्यानंतर, शुक्रवारी सुनावणी झाल्यानंतर आज सोमवारीही पुन्हा सुनावणी पार पडली. आज अजित पवार गटाने जोरदार युक्तीवाद केला आहे. ही सुनावणी नुकतीच संपली असून शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“आज राष्ट्रवादी पक्षासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांचा (अजित पवार गट) युक्तीवाद आज संपला आहे. त्यांच्याकडून तीन लोकांनी युक्तीवाद केला. परंतु, आजचा त्यांचा युक्तीवाद सुपर सॉनिक स्पीडसारखा होता. आम्हाला ९ नोव्हेंबर रोजी युक्तीवादासाठी बोलावण्यात आलं आहे”, असं अभिषेक मनु सिंघवी म्हणाले.
“याचिकाकर्त्यांकडून आमच्यावर बेकायदेशीर प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. जुलै महिन्यात याचिकाकर्त्यांनी याचिका दाखल केली आहे. पण ऑक्टोबरमध्ये याचिकार्त्यांनी सुपरसॉनिक स्पीड दाखवण्याचा प्रयत्न केला. परंतु, यामुळे निवडणूक आयोगाने त्यांना फटकारलं आहे”, असं सिंघवी म्हणाले.
“अजित पवार गटाकडून २० हजार प्रतिज्ञापत्रे सादर करण्यात आली आहेत. त्यापैकी ९ हजार प्रतिज्ञापत्रांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत. जर इतर प्रतिज्ञापत्रांची चौकशी केल्यास किती त्रुटी बाहेर येतील. त्यांना हे प्रकरण तातडीने मार्गी लावायचं असल्याने ते आम्हाला कमी वेळ देण्याचा प्रयत्न करत आहेत. पण निवडणूक आयोगाने त्यांचं ऐकलं नाहीय”, असंही ते म्हणाले.