पीटीआय, वाराणसी
वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाने ज्ञानवापी संकुलाच्या सर्वेक्षणाचा मोहोरबंद अहवाल उघडून, पक्षकारांना तो सुपूर्द करण्यासंदर्भात सुनावणीसाठी ३ जानेवारी ही तारीख निश्चित केली आहे. हिंदू पक्षकारांचे वकील मदन मोहन यादव यांनी ही माहिती दिली. यादव यांनी सांगितले की, शुक्रवार, २२ डिसेंबर रोजी ‘बार कौन्सिल’च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वकिलांनी गुरुवारी काम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. हे लक्षात घेऊन जिल्हा न्यायाधीश ए .के. विश्वेश यांनी सुनावणीसाठी ३ जानेवारीची तारीख निश्चित केली आहे.
मुस्लीम पक्षकारांचे वकील अखलाक अहमद यांनी सांगितले, की शुक्रवारी होणाऱ्या ‘बार कौन्सिल’ निवडणुकीमध्ये ते व्यग्र असल्याने न्यायालयीन कामकाजात हजर राहत नाहीत. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (एएसआय) ने १८ डिसेंबर रोजी जिल्हा न्यायालयात ज्ञानवापी मशीद परिसराचा सर्वेक्षण अहवाल मोहोरबंद लिफाफ्यात सादर केला होता. काशी विश्वनाथ मंदिराशेजारी असलेली ज्ञानवापी मशीद १७ व्या शतकात तेथे आधीपासून असलेले मंदिर पाडून बांधण्यात आल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार ही मशीद ही हिंदू मंदिराच्या पूर्वीच्या रचनेवर बांधली गेली होती की नाही हे शोधण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले. न्यायालयाने हा अहवाल जाहीर करण्यासाठी २१ डिसेंबर ही तारीख निश्चित केली होती. मुस्लीम पक्षकारांनी या दिवशी न्यायालयाने हा अहवाल सार्वजनिक स्वरूपात जाहीर करण्याची विनंती केली होती.