Fiancee Inconsolable After Pilot Dies In Crash : गुजरातमधील जामनगर येथे जॅग्वार जेट अपघातात मृत्युमुखी पडलेले भारतीय हवाई दलाचे फ्लाइट लेफ्टनंट सिद्धार्थ यादव यांचे शुक्रवारी हरियाणामधील त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हजारो स्थानिक लोक, भारतीय हवाई दलाचे अधिकारी, सशस्त्र दलाचे सदस्य, पोलीस अधिकारी आणि राजकीय नेते यादव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जमले होते. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांना साश्रू नयनांनी निरोप दिला. यावेळी वैमानिकाचं जिच्याशी लग्न ठरलं होतं तीही हमसून रडताना दिसली.

“मला त्याचा चेहरा दाखवा…मला पुन्हा एकदा त्याचा चेहरा पाहू द्या”, असं म्हणत तिने मृतदेहाजवळ हंबरडा फोडला. हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मृतदेहाजवळ उभ्या असलेल्या सानिया यांना अश्रू अनावर झाले होते. त्या म्हणाल्या, बेबी, तू मला घ्यायला आली नाहीस, तू मला वचन दिले होतेस. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये, सानिया म्हणाल्या की तिच्यापेक्षा कोणतीही मुलगी अभिमानी असू शकत नाही. घटनेच्या फक्त १० दिवस आधी यादव आणि सानिया यांचा साखरपुडा झाला होता. २ नोव्हेंबर रोजी त्यांचे लग्न होणार होते.

वैमानिकाचा मृत्यू, सहकारी जखमी

हरियाणाच्या रेवाडी येथील रहिवासी असलेले यादव यांचे जॅग्वार लढाऊ विमान जामनगर हवाई दलाच्या तळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच तांत्रिक बिघाडामुळे कोसळून त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे सहकारी मनोज कुमार सिंग जखमी झाले आणि सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

यादव नुकतेच रजेनंतर कर्तव्यावर परतले होते आणि जेव्हा हा अपघात झाला तेव्हा ते नियमित उड्डाण करत होते. पायलटच्या मृत्यूची बातमी शेअर करताना, आयएएफने लिहिले, “आयएएफला जीवितहानीबद्दल मनापासून दु:ख आहे आणि शोकाकुल कुटुंबासोबत ठामपणे उभे आहे. अपघाताचे कारण शोधण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरी स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.”

हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनीही पायलटच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. “जामनगरजवळील हवाई दलाच्या विमान अपघातात रेवाडीतील माजरा (भालखी) गावचे सुपुत्र जग्वार पायलट सिद्धार्थ यादव यांना मी आदरांजली वाहतो. हरियाणाच्या बलिदान भूमीवरील मुलाचे हे बलिदान नेहमीच लक्षात राहील. या दुःखाच्या वेळी, आपण सर्वजण पूर्ण संवेदनशीलतेने शहीदांच्या कुटुंबासोबत उभे आहोत आणि नातेवाईकांना माझी पूर्ण सहानुभूती देतो”, असे त्यांनी X वर लिहिलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

सिद्धार्थ यादव यांचे वडील, आजोबा अन् पणजोबाही लष्करी सेवेत होते

यादव हे माजी सैनिकांच्या कुटुंबातील होते, त्यांचे वडील सुशील यादव यांनी आयएएफमध्ये सेवा बजावली होती आणि त्यांचे आजोबा आणि पणजोबा यांनीही सैन्यात सेवा बजावली होती. त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी, हातात तिरंगा घेऊन अनेक माजी सैनिकांसह मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उभे होते आणि आयएएफ अधिकाऱ्याचे पार्थिव घेऊन जाणारे वाहन रस्त्यावरून जात असताना फुलांचा वर्षाव होत होता. त्यांच्या पार्थिवाला अंत्यसंस्कार करण्यात आले तेव्हा हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी तोफांची सलामीही दिली.