Mecca Hajj Pilgrims Death Update : सौदी अरेबियातील मक्का येथे हज यात्रा सध्या सुरू आहे. या यात्रेमध्ये तब्बल १००० भाविकांना तीव्र उष्णतेमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या सौदी अरबसह मध्य पूर्व आशियात उष्णतेची लाट पसरली आहे. या उष्णतेच्या लाटेचा हज यात्रेवरही गंभीर परिणाम झाला आहे. बुधवारी तब्बल ५५० हज यात्रेकरुंचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता या मृतांच्या संख्येत वाढ झाली असून मृतांची संख्या सध्या एक हजारावर पोहोचली आहे.
इस्लाम धर्मामध्ये हज यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक मुस्लीम व्यक्तीने आयुष्यात एकदा तरी हज यात्रेला जायला हवं असं बोललं जातं. त्यामुळे जगभरातील लाखो मुस्लीम व्यक्ती हज यात्रेसाठी मक्केला जात असतात. सध्या हज यात्रा सुरु आहे. त्यासाठी लाखो यात्रेकरू तेथे दाखल झाले आहेत. हवामान बदलामुळे तेथील वातावरणावर गंभीर परिणाम होत आहेत. तसेच हज यात्रेवरही त्याचे परिणाम होत असल्याचं दिसत आहे.
हेही वाचा : Heat wave : हजसाठी गेलेल्या ५५० भाविकांचा मक्केमध्ये उष्माघाताने मृत्यू, २,००० यात्रेकरू रुग्णालयात दाखल
दरम्यान, हजसाठी मक्का शहरात आलेल्या तब्बल एक हजार भाविकांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. तर अनेकांवर जवळच्या रुग्णालयात उपचार चालू आहेत. तसेच मृतांची संख्या आणखी वाढण्याचा धोका असल्याचं बोललं जात आहे. सध्या मक्का येथे ५१.८ अंश सेल्सिअस इतके तापमानाची नोंद झालेली आहे. यासंदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.
यात्रेकरूंना उन्हाचा त्रास कमीत कमी व्हावा, यासाठी तेथील प्रशासनाकडून उपाय योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. सौदी अरेबियात मक्का येथे हज यात्रेत मृत्यू झालेले यात्रेकरू हे वेगवेगळ्या देशातील आहेत. यामध्ये मृत्यू झालेल्यांमध्ये सर्वाधिक यात्रेकरू हे इजिप्तमधील होते, अशी माहिती सांगितली जात आहे. तसेच अजूनही काही लोक बेपत्ता असून त्यांचा त्यांची कुटुंबिय शोध घेत आहेत. दरम्यान, या सौदी अरेबियात या हज यात्रेसाठी नायजेरिया, इराण, तुर्की, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, पाकिस्तान, भारत, बांगलादेशसह अनेक देशांतून जातात.