Heathrow airport Closed after substation fire in London : लंडनच्या पश्चिम भागातील एका सबस्टेशनला लागलेल्या आगीमुळे लंडनचे हिथ्रो विमानतळ मध्या रात्रीपर्यंत बंद करण्यात आले आहे. यामुळे येणाऱ्या आणि जाणाऱ्या किमान १,३५१ विमानांना याचा फटका बसला आहे. या आगीच्या घटनेमुळे शहरातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात वीज खंडीत झाली असून १६ हजारहून अधिक घरांमधील वीज गेली आहे. ब्रिटिश माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, १५० हून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

लंडन अग्निशमन दलाने सांगितले की, त्यांनी सुमारे १० फायर इंजिन्स आणि जवळपास ७० अग्निशामक दलाचे जवान तैनात केले आहेत. याबरोबरच २०० मीटरचा सुरक्षा घेरा तयार करण्यात आला आहे. दरम्यान आग लागलेले सबस्टेशन हे लंडनच्या Hillingdon borough मधील Hayes येथे असून येथील स्थानिक रहिवाशांना धुरामुळे घरात राहण्यास आणि खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवण्यास सांगण्यात आले आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्टवर पोस्ट करता विमानतळ व्यवस्थापनाने सकाळी (भारतीय वेळेनुसार) प्रवाशांना प्रवास टाळण्याचा सल्ला दिला असून पुढील माहितीसाठी त्यांच्या संबंधीत एअरलाईनशी संपर्क साधण्यास सांगितले आहे. “विमानतळाला वीज पुरवठा करणाऱ्या इलेक्ट्रिक सबस्टेशला आग लागल्याने, हिथ्रो विमानतळाचा वीज पुरवठा मोठ्या प्रमाणात खंडीत होत आहे. आमच्या प्रवाशांच्या आणि सहकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी हिथ्रो २१ मार्च रोजी रात्री ११.५९ पर्यंत बंद असेल,” असे विमानतळाकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान सबस्टेशनला लागलेल्या आगीचे काही व्हिडीओ रशियन सरकारच्या वृत्तसंस्थेने शेअर केले आहेत. या व्हिडीओंमध्ये आगीचे रौद्र रूप पाहायला मिळत असून आगीच्या ज्वाळा हवेत जाताना दिसत आहेत, तसेच परिसरात धुर भरल्याचे दिसून येत आहे.

हिथ्रो जगातील सर्वाधिक गर्दी असलेल्या विमानतळापैकी एक आहे. २०२४ मध्ये या विमानतळावरून विक्रमी ८४ दशलक्ष प्रवाशांनी प्रवास केला होता. त्यापैकी एक तृतीयांश प्रवासी युरोपियन युनियनमधील होते.

Story img Loader