देशभरातील बहुतांश भागात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट पसरली होती. नागरिक प्रचंड उकाड्याने हैराण झाले होते. अशातच एक चांगली बातमी समोर आली आहे. दिल्ली एनसीआर, उत्तर भारतासह देशभरातल्या बहुतांश भागातली उष्णतेची लाट ओसरू लागली आहे. बुधवारपासून (२४ मे) तापमानात घट झाल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. यासह देशातल्या अनेक राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
देशातल्या अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपीट होऊ शकते. त्यामुळे भारतीय हवामान विभागाने अनेक भागांमध्ये यल्लो अलर्ट जारी केला आहे. राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि चंदीगड या राज्यांमध्ये यल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान तज्ज्ञ आर. के. जेनामणी यांनी सांगितलं की, पुढील दोन ते तीन दिवस डोंगराळ भागात मुसळधार पाऊस होऊ शकतो. तसेच पूर्व भारतात जोरदार वादळाची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून राजधानी दिल्लीसह आसपासच्या भागात कमाल तापमान ४० अंशांच्या पुढे तर किमान तापमान २८ अंशांच्या पुढे नोंदवलं जात होतं. परंतु दिल्लीतलं मुख्य हवामान केंद्र सफदरजंग वेधशाळेने बुधवारी किमान तापमान २५.४ अंश सेल्सिअस नोंदवलं तर कमाल तापमान ३९ अंशांवर असल्याचं सांगितलं आहे.
हे ही वाचा >> “…तर २०२४ ला मोदी सरकार येणार नाही”, अरविंद केजरीवालांनी सांगितलं कारण; म्हणाले, “उद्धव ठाकरेंनी…”
उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये काही दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासोबतच गारपीटही होऊ शकते, असं वेधशाळेने म्हटलं आहे. बुधवारपासूनच हवामानात बदल दिसून येत असल्याचं हवामान विभागाने नमूद केलं. दरम्यान, अनेक ठिकाणी ढग दाटून आले असून वातावरण आल्हाददायक झालं आहे.