पाकिस्तानच्या सीमेवरील कुरापती सुरूच असून गेल्या ३६ तासांत शस्त्रसंधीचे वारंवार उल्लंघन करून भारतीय चौक्यांवर अंदाधुंद गोळीबार केला. रविवारीदेखील पाकिस्तानी सैनिकांकडून गोळीबार सुरूच होता. या गोळीबारात गस्तीवर असलेला सीमा सुरक्षा दलाचा एक जवान गंभीर जखमी झाला आहे. जम्मू जिल्ह्य़ातील कानाचक भागातील अल्फा माचेल चौकीवर पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार केल्याची माहिती वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी दिली.
पाकिस्तानी सैनिकांच्या गोळीबाराला भारतीय जवानांनी सडेतोड उत्तर देत त्यांचा हल्ला परतवून लावला. यावेळी सीमा सुरक्षा दलाचा जवान पवन कुमार हा गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती जम्मू वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिली. छातीत आणि पायाला गोळ्या लागल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या पवन कुमारला उपचारासाठी दिल्लीतील एआयआयएमएस रुग्णालयात हलविण्यात आल्याचेही डॉक्टारांनी सांगितले. दरम्यान, पाच ऑगस्ट रोजी जम्मूतील सांबा क्षेत्रात पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात गंभीर जखमी झालेले सीमा सुरक्षा दलाचे मुख्य हवालदार राम निवास मीना यांचा रविवारी दिल्लीतील एआयआयएमएस रुग्णालयात मृत्यू झाला. तीनच दिवसांपूर्वी पाकिस्तानी सैन्याच्या हल्ल्यात पाच भारतीय जवान शहीद झाले.
पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात भारताचे पाच जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानने स्वीकारावी, अशी आग्रहाची मागणी भारताने रविवारी केली. पाकिस्तानने शांतता प्रक्रियेला बाधा येईल असे कृत्य करू नये, असे परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी पाकिस्तानला सुनावले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा