दिल्लीत जोरदार पावसाने ठिकठिकाणी पाणी साठले असून लागोपाठ दुसऱ्या दिवशी वाहतूक कोलमडली आहे. अनेक ठिकाणी प्रवाशांना तासभर अडकून पडावे लागले. यात स्थानिक प्रशासनाचे अपयश उघडपणे दिसून आले.
हवामान कार्यालयाने म्हटले आहे, की दिल्लीत गेल्या तीन दिवसांत १०० मि.मी. पाऊस झाला असून मोसमातील जास्त पाऊस ९३.८ मि.मी. इतका काल नोंदण्यात आला. दोन दिवसांत दिल्लीमध्ये आणखी पावसाची शक्यता आहे. रात्रभर पडलेल्या पावसाने ठिकठिकाणी पाणी साठले व वाहतूक कोंडी झाली.
आयटीओ, विकास मार्ग, साऊथ एक्सटेन्शन खानपूर, महिपालपूर, हरीनगर, आयआयटी क्रॉसिंग, नेहरू प्लेस, युसुफ सराय मार्केट व मुनीरका येथे वाहतूक कोंडी झाली. लक्ष्मीनगर, काश्मिरी गेट, द्वारका, धौलाकुआ, सराय काले खान, मूलचंद, करकरदुमा, राजघाट, कालिंदी कुंज येथेही वाहतूक विस्कळीत झाली. काही ठिकाणी पाणी तळमजल्यावरील सदनिकांत घुसले. अनेक लहान-मोठय़ा रस्त्यांवर पाणी साठले होते. दिल्ली सरकारने पाणी साठल्याच्या तक्रारींवर २४ तास हेल्पलाइन सुरू केली होती. भाजपची सत्ता असलेल्या पालिकेने पाणी साठण्यास दिल्ली सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला. सदोष सांडपाणी व्यवस्थेमुळे रस्त्यांवर पाणी साठले असे दिल्ली सरकारने म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rain disrupted traffic in delhi