नवी दिल्ली :उत्तर भारतात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. उत्तर प्रदेशात पावसाशी संबंधित घटनांमुळे चार जण मरण पावले. दिल्लीला पाऊस व पूरस्थितीचा मोठा तडाखा बसला असून, काही ठिकाणी रुग्णालयांतून रुग्णांना इतरत्र हलवणे भाग पडले. यमुनेच्या पाण्याची पातळी वाढतच असल्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. दिल्लीत कमी महत्त्वाची सरकारी कार्यालये, शाळा- महाविद्यालये रविवापर्यंत बंद ठेवण्यात आली असून, पंजाबमध्येही शाळा बंदची मुदत रविवापर्यंत वाढविली आहे.
राजधानी दिल्लीत रस्त्यांना नदीचे स्वरूप येऊन पाणी घरे, रुग्णालये, स्मशानभूमी आणि निवारागृहांमध्ये शिरल्यामुळे सामान्य जनजीवन कोलमडले आहे. यमुनेचे पाणी गुरुवारी दुपारी एक वाजेपर्यंत २०८.६२ मीटर इतक्या विक्रमी पातळीपर्यंत वाढले. यामुळे ४५ वर्षांपूर्वीचा २०७.४९ मीटरचा विक्रम मोडला आहे. यमुनेच्या वाढत्या पातळीमुळे वझिराबाद, चंद्रवाल व ओखला येथील जल प्रक्रिया केंद्रे बंद करावी लागल्याने दिल्ली सरकारने पाणीपुरवठय़ात २५ टक्के कपात केली. यामुळे शहराला पाणीटंचाईचे संकट भेडसावत आहे.
दिल्ली सरकारतर्फे चालवल्या जाणाऱ्या उत्तर दिल्लीतील एका ट्रॉमा सेंटरमध्ये पाणी शिरू लागल्यामुळे, अधिकाऱ्यांनी या ठिकाणच्या सुमारे ४० रुग्णांना लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयात हलवण्यास सुरुवात केली. सुश्रुत ट्रॉमा सेंटरमधून हलवण्यात येणाऱ्यांमध्ये अतिदक्षता विभागातील तीन रुग्णांचाही समावेश असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. पाणी या परिसरात शिरल्यामुळे ट्रॉमा सेंटरचे मुख्य द्वार जलमय झाले.
यमुनेचे पाणी वाढत असल्याने दिल्ली पोलिसांनी गुरुवारी वाहनांच्या वाहतुकीवरील निर्बंध आणि नियमन यांसाठी सूचनावली जारी केली. विशेषत: प्रवासी अनेक तासांपर्यंत अडकून पडलेल्या पूर्व दिल्लीसह शहराच्या अनेक भागांत यमुना दुथडी भरून वाहत असल्याने रस्ते बंद झाल्यामुळे वाहतुकीला फटका बसला.
पाणी साचल्याने अनेक रेल्वे गाडय़ा रद्द
गेल्या काही दिवसांत मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने ७ ते १५ जुलै या कालावधीत तीनशेहून अधिक मेल व एक्स्प्रेस रेल्वेगाडय़ा, तसेच ४०६ पॅसेंजर गाडय़ा रद्द करण्यात आल्या. सर्व मिळून सुमारे ६०० मेल व एक्स्प्रेस गाडय़ा प्रभावित झाल्या आहेत. पाणी साचल्यामुळे यापैकी काही गाडय़ा रद्द करण्यात आल्या, काही वळवण्यात आल्या, तर काही गंतव्य स्थानाच्या आधीच थांबवण्यात आल्या, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
भाजपचा आरोप
दिल्लीतील अभूतपूर्व पूरपरिस्थितीवरून दिल्ली भाजपने केजरीवाल सरकारवरील हल्ला तीव्र केला आहे. यमुनेचे पाणी गुरुवारी आयटीओ व सिव्हिल लाइन्ससारख्या भागांमध्ये शिरल्यानंतर, दिल्ली हे ‘गटर’ झाले असून ही मोफत रेवडी वाटण्याची किंमत आहे, अशी टीका पक्षाचे खासदार गौतम गंभीर यांनी केली.
पावसाचे चार बळी
उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यात पावसाशी संबंधित निरनिराळय़ा घटनांमध्ये किमान चार जण ठार, तर तिघे जखमी झाले. त्यापैकी दोघांचा वीज कोसळून आणि दोघांचा भिंत कोसळून मृत्यू झाला. अहिर खेडय़ात अंगावर वीज कोसळल्याने तीन शेतकरी जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले.