Heavy rainfall in Gujarat: गुजरातमध्ये काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असून राज्याच्या अनेक भागात पूर आला आहे. बडौद्याला पूराचा सर्वाधिक फटका बसला असून शहरातील काही भागात १० ते १२ फुटापर्यंत पाणी साचले आहे. मागच्या तीन दिवसांत पाऊस आणि पूरामुळे २६ जणांचे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर पूरग्रस्त भागातून १८ हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. यानंतर गुरूवारी हवामान विभागाने १० जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट तर २२ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुजरात सरकारने दिलेल्या माहितीनुसार, मोरबी, बडौदा, भरूच, जामनगर, अरवली, पंचमहल, द्वारका आणि दांग या जिल्ह्यात प्रत्येकी एका नागरिकाचा मृत्यू झाला. तर आनंद जिल्ह्यात सहा, अहमदाबादमध्ये चार आणि गांधीनगर, खेडा, महीसागर, दाहोड आणि सुरेंद्रनगरमध्ये प्रत्येकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

पूरातून वाचण्यासाठी अनेक भागात लोकांनी घराच्या छतावर आसरा घेतला आहे. बडौदामधील हजारो नागरिकांना एनडीआरएफच्या पथकाकडून सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. तसेच एसडीआरएफचेही अनेक पथके ठिकठिकाणी बचाव कार्य करत आहेत.

हे वाचा >> अफगाणिस्तानमध्ये ५.७ रिश्टर स्लेक तीव्रतेचा भूकंप; राजधानी दिल्लीपर्यंत जाणवले हादरे…

पंतप्रधान मोदींकडून मुख्यमंत्र्यांना फोन

गुजरातच्या काही भागात अन्यधान्याची टंचाई भासत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी फोनवरून संवाद साधत राज्यातील अन्यधान्याच्या साठ्याबाबत माहिती घेतली. तसेच या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी केंद्र सरकार पूर्ण ताकदीनिशी गुजरातच्या पाठीशी आहे, असेही पंतप्रधानांनी आश्वास दिले.

मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी एनडीआरएफचे आणखी पाच पथक बचाव कार्यासाठी तैनात केले आहेत. तसेच लष्कराचीही मदत घेतली जात आहे. बडौदामध्ये बचावकार्य आणि मदतकार्य मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आले आहे. ज्याठिकाणी पूराचा सर्वाधिक फटका बसला आहे, त्याठिकाणी लष्काराच्या सहा तुकड्या बचाव कार्यात गुंतल्या आहेत.

हे ही वाचा >> Heavy rainfall in Gujarat: गुजरातमध्ये मुसळधार पाऊस; अनेक भाग जलमय, १ सप्टेंबरपर्यंत अतिवृष्टीचा इशारा

धरणे, नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली

गुजरात सरकारच्या अधिकृत माहितीनुसार, राज्यातील १४० जलाशय पूर्ण भरली असून २४ नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे आसपासच्या परिसराला धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. पूराचे पाणी साचल्यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून अनेक ठिकाणी वाहतूक खंडीत झाली आहे. राज्यातील २०६ धरणांपैकी १२२ धरणांच्या परिसराला हाय अलर्ट देण्यात आला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rainfall in gujarat due to flood waterlogging death toll reaches 28 and 18000 displaced pm assures help kvg