उत्तराखंडात मंगळवारी मुसळधार पाऊस पडल्यामुळे राज्यभरात अनेक ठिकाणी ढगफुटी, घरे कोसळण्याच्या घटना घडल्या. काही ठिकाणी कडेही कोसळल्याचे वृत्त आहे.
पौरी जिल्ह्य़ातील गाडोली गावी झालेल्या ढगफुटीमुळे शाळेच्या एका इमारतीनजीकच्या रस्त्याची मोठी हानी झाली. या ठिकाणी सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
चमोली जिल्ह्य़ातही सोमवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे अनेक ठिकाणी कडे कोसळल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या भागात अन्नधान्याचा पुरवठाही थंडावला असून खराब हवामान आणि कमी दृश्यमानतेमुळे हेलिकॉप्टर्सच्या उड्डाणांवर विपरीत परिणाम झाला आहे. देवल भागात रस्त्यावर उभी करून ठेवलेली दोन वाहने मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून गेली. गौचर येथेही कडे कोसळल्यानंतर अनेक घरांना चिखलमातीचा सामना करावा लागला. देओसरी गावी १४ घरांना तडे गेल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
उत्तरकाशी येथे भागीरथी नदी भरून वाहू लागली आहे. डोंगराळ भागातील माती मोठय़ा प्रमाणावर रस्त्यावर आल्यामुळे बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री येथील राष्र्ट्ीय महामार्ग अनेक ठिकाणी ठप्प झाले आहेत.

Story img Loader