लोकसभा निवडणुकीत मोदीलाटेत अनेक दिग्गज वाहून गेलेत व दगडधोंडय़ांनाही शेंदूर फासला गेला. लाट अशीच असते. बरं स्वत:च्या जहाजाच्या शिडात हवा नसताना इतरांच्या राजकीय भवितव्याची काळजी वाहणाऱ्यांची एक गंमत असते. लाटेचा अंदाज आल्यावर सर्वात आधी याच गटाचे लोक जहाज सोडून जातात. पाठोपाठ नेतेही जातात. लाट शांत झाल्यावर कुणातरी बेटावर गेलेल्यांना पुन्हा परतीचे वेध लागतात. मग नव्या भरभक्कम जहाजाचा आधार शोधला जातो. प्रत्येक निवडणुकीनंतर हाच प्रकार घडतो. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपापल्या बेटावर विश्रांती करणाऱ्या काँग्रेस नेत्यांना परत बोलावण्यासाठी हायकमांडनेच पुढाकार घेतला. पण काँग्रेसचा प्रत्येक बडा नेता सध्या स्वत:च्याच कामात व्यस्त आहे. काँग्रेसची वकिली करणारे दिग्गज नेते कुठे गायब झाले कुणास ठाऊक?
निवडणुकीच्या रणधुमाळीत कपिल सिब्बल, मनीष तिवारी, दिग्विजय सिंह यांना म्हणे प्रदेश काँग्रेसकडून सभा घेण्याची विनंतीच करण्यात आलेली नाही. कारण अजय माकन यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित करण्यात आले. अजय माकन प्रसिद्धी माध्यम विभागाचे प्रमुख आहेत. महाराष्ट्र-हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी वृत्तवाहिन्यांवर चर्चेला जाण्याची विनंती अजय माकन यांच्या कार्यालयातून करण्यात येत होती. माकन यांच्या कार्यालयातून थेट चिदम्बरम यांना फोन गेला. माकन यांच्या स्वीय सहायकाने चिदम्बरम यांना माकन यांचा निरोप दिला. त्यावर म्हणे चिदम्बरम चांगलेच उखडले. मला थेट का फोन केलास, इथून सुरू झालेली नाराजी ‘मला चर्चेला जायला वेळ नाही, इथपर्यंत येऊन संपली. यापुढे माकन यांना मला सांगायचे असल्यास त्यांनाच थेट फोन करायला सांग, अशी तंबी देऊन चिदम्बरम यांनी फोन ठेवला. तेव्हापासून म्हणे माकन यांनी चिदम्बरम यांना महत्त्व न देण्याचे ठरवले. त्यामुळे दिल्लीत प्रचार करण्यासाठी बोलावण्यात येणाऱ्या नेत्यांमध्ये चिदम्बरम यांचे नाव नाही.
सिब्बल, मनीष तिवारी मंत्री असताना कार्यकर्त्यांना भेटत नसत. सिब्बल कायदामंत्री असताना अनेक कार्यकर्त्यांचे प्रस्ताव ‘नोटरी’साठी रखडले होते. त्यांनीही म्हणे माकन यांचे कान भरले. आता माकन एकहाती किल्ला लढवत आहेत. त्यांच्या जोडीला अरविंदर सिंह लवली आहेत. अजून एक आठवलं- शीला दीक्षित यांचे चिरंजीव संदीप दीक्षित कुठे दिसत नाहीत ते? ते म्हणत होते प्रचाराची धुरा मी सांभाळतो. तर माकन म्हणाले- निवडणूक लढवावी लागेल. संदीप दीक्षित यांना खर्च नकोसा वाटतोय. प्रचाराऐवजी काँग्रेसमध्ये एकमेकांनाच शह आणि मात देण्यात नेत्यांचा वेळ खर्ची होत आहे.
चाटवाला
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा