पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आई हिराबेन मोदी यांचं आज पहाटे साडेतीनच्या सुमारास अहमदाबादमध्ये निधन झालं. पंतप्रधान मोदी आईच्या अंत्यसंस्कारासाठी गांधीनगरला जाऊन पुन्हा दिल्लीत परतले आहेत. काही दिवसांपूर्वीच आईच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींनी त्यांची आई कधीच त्यांच्याबरोबर एखाद्या सरकारी कार्यक्रमाला किंवा सोहळ्याला उपस्थित का राहत नाही याबद्दल भाष्य केलं होतं.
“मलाही तुझ्या इतकाच अभिमान वाटतो. इथं माझं काहीच नाही. मी केवळ देवाच्या योजनेमधील एक भाग आहे,” असं मोदींनी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती तेव्हा त्यांच्या आईे सांगितलं होतं. मात्र मागील आठ वर्षांपासून मुलगा पंतप्रधान असतानाही हिराबेन कधी सरकारी अथवा मोठ्या कार्यक्रमामध्ये मोदींबरोबर दिसून आल्या नाहीत. हिराबेन मोदींबरोबर कार्यक्रमांना का जायच्या नाहीत याबद्दल मोदींनीच त्यांच्या ‘आई’ नावाच्या ब्लॉग पोस्टमध्ये लिहिलं आहे. आई माझ्याबरोबर केवळ दोन वेळा सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहिलेली असं मोदींनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
नक्की वाचा >> Heeraben Modi Passes Away: नरेंद्र मोदींसारख्या व्यक्तीला जन्म देणं हे हिराबेन यांचं मोठं योगदान; संजय राऊतांची श्रद्धांजली
“तुम्ही हे पाहिलं असेल की माझी आई कधीच माझ्याबरोबर कोणत्याही सरकारी किंवा सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित नसते. ती यापूर्वी केवळ दोनदा माझ्याबरोबरीने सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहिली होती,” असं मोदींनी या पोस्टमध्ये सांगितलं आहे. मोदी पुढे लिहितात, “पहिल्यांदा ती अहमदाबादमधील एका सार्वजनिक कार्यक्रमाला माझ्याबरोबर उपस्थित होती. मी श्रीनगरमधून परत आल्यानंतर माझ्या माथ्यावर टीळा तिनेच लावला होता. मी एकता यात्रा पूर्ण करुन श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा पडकावून परतलो होतो.”
नक्की वाचा >> मोदींना मातृशोक: “संपूर्ण देश दु:खाच्या या प्रसंगी…”; मोदींच्या आईच्या निधनानंतर अमित शाहांनी केला धीर देण्याचा प्रयत्न
“माझ्या आईसाठी तो फार भावनिक क्षण होता कारण पगवारा येथे एकता यात्रेवर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारामध्ये काही लोकांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी तिला माझी फार चिंता वाटत होती. त्यानंतर दोन जणांनी माझी चौकशी करण्यासाठी फोन केले होते. पहिली व्यक्तीमध्ये अक्षरधाम मंदिराचे श्रध्येय प्रमुख स्वामी आणि दुसरी व्यक्ती म्हणजे माझी आई. तिच्या बोलण्यावरुनच तिला दिलासा मिळाल्याचं जाणवत होतं,” असं मोदी म्हणाले होते.
नक्की वाचा >> मोदींना मातृशोक : राज्यपाल कोश्यारी हळहळले, सुप्रिया सुळे म्हणाल्या, “आम्ही सर्वजण मोदी कुटुंबाच्या…”
“२००१ साली जेव्हा मी गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तेव्हा माझी आई माझ्याबरोबर होती. हाच तो दुसरा क्षण जेव्हा ती अशाप्रकारे सार्वजनिक कार्यक्रमाला माझ्याबरोबर आली होती. दोन दशकांपूर्वी झालेला हा कार्यक्रम शेवटचा ठरला जेव्हा आईने माझ्याबरोबर एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यानंतर ती एकाही सार्वजनिक कार्यक्रमाला माझ्याबरोबर आली नाही,” असं मोदींनी सांगितलं.
आपण आपल्या मुलासाठी काही केलेलं नाही. आपण केवळ एका ईश्वरी योजनेचा भाग आहोत यावर हिराबेन मोदींचा विश्वास होता. त्यांनी अनेकदा तसं मोदींना बोलूनही दाखवलं आहे. त्यामुळेच त्या अशाप्रकारे सार्वजनिक कार्यक्रमांना मोदींबरोबर जात नव्हत्या.