इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर कोसळले आहे. या घटनेला १६ तास उलटून गेले आहेत. तरीही त्यांचा ठावठिकाणा समजू शकलेला नाही. रईसी यांच्यासह इराणचे पराराष्ट्र मंत्री आमिर अब्दुल्लाहिया हेदेखील हेलिकॉप्टरमध्ये बसले होते. शोध आणि बचाव पथकाचे सदस्य हेलिकॉप्टरचा शोध घेण्याच्या प्रयत्नात आहेत मात्र अद्याप त्यांना यश आलेलं नाही. त्यामुळे रईसी आणि अब्दुल्लाह कुठे आहेत हे समजू शकलेलं नाही.
इराणच्या वृत्तसंस्थेने काय म्हटलं आहे?
इराणची सरकारी वृत्तसंस्था असलेल्या आयआरएनएने ही माहिती दिली आहे की अपघात झालेल्या हेलिकॉप्टरचा शोध घेण्यासाठी १६ पथकं कामाला लागली आहे. मात्र खराब हवामानामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. रईसी हे इराणच्या पश्चिम बाघातील अझरबैजान या डोंगराळ भागात सरकारी दौऱ्यावर होते. त्यांच्या ताफ्यात आणखी दोन हेलिकॉप्टर होती जी व्यवस्थित आपल्या ठिकाणी पोहचली आहेत. रईसी यांचं हेलिकॉप्टर कोसळल्याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. तसंच रईसी सुरक्षित आहेत का? याचीही माहिती इराणकडून अद्याप देण्यात आलेली नाही.
कधी घडली घटना?
इराणी वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार ही रियासी यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात रविवारी दुपारी १ वाजता म्हणजे भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३ वाजता झाला. यानंतर शोध मोहीम सुरु करण्यात आली आहे. मात्र इब्राहिम रईसी यांच्याबाबत कुठलीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. मात्र धुकं आणि खराब हवामान यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. या अपघाताची माहिती समोर आल्यानंतर इराणची चिंता वाढली आहे. राष्ट्रपती रईसी हे सुखरुप परत येतील असा विश्वास आम्हाला वाटतो आहे असं तिथले एक बडे नेते अयातुल्ला खैमी यांनी म्हटलं आहे.
कोण आहेत इब्राहिम रईसी?
इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा जन्म इराणच्या मशहद शहरात १९६० मध्ये झाला. रईसी यांचे वडील मौलवी होते. रईसी पाच वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं. धर्म आणि राजकारण हे रईसी यांचे आवडते विषय आहेत. महाविद्यालयीन आयुष्यापासूनच त्यांनी आंदोलनांमध्ये आणि विविध चळवळींमध्ये भाग घेतला आहे.
इराणच्या न्याय व्यवस्थेत काम, वादग्रस्त निर्णयांमध्ये सहभाग
इब्राहिम रईसींनी इराणच्या न्याय व्यवस्थेत काम केलं आहे. तसंच अनेक वादग्रस्त निर्णयही त्यांनी घेतले आहेत. १९८८ मध्ये इराणच्या कैद्यांना सामूहिक फाशी देण्यात आली. या निर्णय प्रक्रियेत रईसी सहभागी होते.
या सामूहिक फाशीच्या शिक्षेत कमीत कमी ५ हजार कैद्यांना फाशी देण्यात आली अशी माहिती आंतराराष्ट्रीय मानवाधिकार संघाने दिली आहे. ही शिक्षा सुनावणारा जो आयोग होता त्या आयोगाचे एक सदस्य रईसी होते.
या सगळ्या घडामोडींनंतर त्यांनी इराणच्या राजकाणात प्रवेश केला.
इराणच्या अध्यक्षपदाची निवडणूक त्यांनी दोनदा लढवली. २०१७ मध्ये ते ही निवडणूक हरले होते. पण २०२१ मध्ये त्यांनी ही निवडणूक जिंकली.