Uttarakhand Helicopter Crash : केदारनाथमध्ये एक हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात हेलिकॉप्टरमधील सर्वच्या सर्व सहाजणांचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाने तातडीने घटनास्थळी बचाव पथक पाठवलं आहे. हेलिकॉप्टरने केदारनाथ बेस कॅम्प येथून नारायण कोटी-गुप्तकाशीसाठी उड्डाण केलं आणि केदारनाथपासून तीन किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला.

उत्तराखंडमधील फाटा भागात हा अपघात झाला. यात सर्व सहा प्रवाशांचा मृत्यू झाला, अशी माहिती मुख्यमंत्र्यांचे विशेष प्रधान सचिव अभिनव कुमार यांनी माहिती दिली. अपघातग्रस्त हेलिकॉप्टर आर्यन या कंपनीचं असल्याची माहिती मिळत आहे.

व्हिडीओ पाहा :

या अपघातानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचं म्हणत मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे.

केदारनाथमध्ये धुक्याची चादर

केदारनाथमध्ये सध्या धुक्याची दाट चादर आहे. त्यामुळे या भागातील दृष्यता कमी झाली आहे. याचाच फटका हवाई वाहतुकीला बसत आहे.

२०१९ मध्येही हेलिकॉप्टर अपघाताची घटना

केदारनाथमध्ये २०१९ मध्येही हेलिकॉप्टर कोसळून अपघात झाला होता. मात्र, त्यावेळी फाटाला जाताना उड्डाण करत असतानाच तांत्रिक अडचण आल्याचं लक्षात आलं आणि वैमानिकाने आपतकालीन लँडिंग केलं. त्यावेळी हेलिकॉप्टरचं नुकसान झालं, मात्र, जीवितहानी झाली नाही.

ेहही वाचा : VIDEO : केदारनाथमध्ये अनियंत्रित हेलिकॉप्टरचे धोकादायक लँडिंग; डीजीसीएने जारी केल्या मार्गदर्शक सूचना

२०१३ मध्ये तीन हेलिकॉप्टर कोसळले

केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर अपघाताची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही केदारनाथमध्ये नैसर्गिक आपत्तीत बचाव कार्य करताना वायू सेनेसह एकूण तीन हेलिकॉप्टर कोसळले होते. त्यात एकूण २३ लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.

Story img Loader