ऑगस्टावेस्टलॅंड या इटालियन कंपनीबरोबर अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी १२ हेलिकॉप्टर्स खरेदी करण्याच्या व्यवहारात लाचखोरी झाल्याच्या आरोपामुळे हा व्यवहारच रद्द करण्यासाठी सरकारने शुक्रवारी पावले उचलण्यास सुरुवात केली. लाचखोरीच्या आरोपांबद्दल सात दिवसांत स्पष्टीकरण करण्यात यावे, असे बजावणारी कारणे दाखवा नोटीस कंपनीला संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते सितांशू कार यांनी सांगितले,”ऑगस्टावेस्टलॅंड कंपनीबरोबर झालेला ३६०० कोटी रुपयांचा हेलिकॉप्टर खरेदी व्यवहार रद्द का करण्यात येऊ नये, हे कंपनीने स्पष्ट करावे, असे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.
हा व्यवहार रद्द का करण्यात येऊ नये तसेच करारातील तरतुदींनुसार कारवाई का करण्यात येऊ नये, अशी विचारणा कंपनीला करण्यात आली आहे. या व्यवहारात लाचखोरी झाली असेल तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल तसेच कंपनीला दिलेली रक्कम परत घेण्यात येईल, असा इशारा सरकारने गुरुवारीच दिला होता. या व्यवहारात ३६२ कोटी रुपयांची लाच देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यासंदर्भात इटलीत काही अधिकाऱ्यांना अटक करण्यात आल्यानंतर भारताने हा व्यवहार स्थगित केला.
दरम्यान, संरक्षण मंत्रालयाच्या तक्रारीवरून केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) हेलिकॉप्टर घोटाळ्याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.

Story img Loader