मध्यप्रदेश मंत्रिमंडळाने सरकारी हेलिकॉप्टर बेल-४३० बाबत मोठा निर्णय घेतला आहे. हे विमान २.५७ कोटी रुपयांना विकण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. याच हेलिकॉप्टरमध्ये गायिका अनुराधा पौडवाल यांचं २००३ साली अपघात झाला होता. त्यात आता सर्वाधिक बोली लावणाऱ्याला हे हेलिकॉप्टर विकले जाणार आहे.
मध्यप्रदेश सरकारमधील एका अधिकाऱ्याने सांगितलं की, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी भोपाळ येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली. २००३ साली या हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता. तसेच, बेल-४३० हेलिकॉप्टरचे उत्पादन देखील कंपनीने बंद केले होते. त्यामुळे हे हेलिकॉप्टर उड्डाणासाठी अयोग्य असल्याने ते विकण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, असेही अधिकाऱ्याने म्हटलं.
सातव्यांदा विक्रीसाठी निविदा काढली
१९९८ साली बेल-४३० हे हेलिकॉप्टर खरेदी करण्यात आले होते. २१ फेब्रवारी २००३ साली बॉलिवूड गायिका अनुराधा पौडवाल यांचा इंदूरमधील विजय नगरजवळ येथे सरकारी कार्यक्रमासाठी जाताना हेलिकॉप्टरचा अपघात झाला. या अपघातात पौडवाल यांना किरकोळ दुखापत झाली होती. तर, त्यांच्यासमवेत असणारा एक अधिकारी गंभीर जखमी झालेला. हेलिकॉप्टर विक्रीसाठी मे २०२२ मध्ये सातव्यांदा निविदा काढली होती. या निविदेनंतर भोपाळमधील एफए एंटरप्रायझेस या कंपनीने २.५७ कोटी रुपयांना विकत घेण्याची ऑफर दिली होती. त्यावर विमान वाहतूक विभागाच्या शिफारशीनंतर वित्त विभागानेसुद्धा हे हेलिकॉप्टर विकण्यास संमती दिली. त्यानंतर मध्यप्रदेश मंत्रिमंडळानेही आता हे हेलिकॉप्टर विकण्यास मंजुरी दिली आहे.