काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. बुधवारी ते सिलिकॉन व्हॅलीतल्या स्टार्टअप उद्योजकांसह होते. त्याच्यासह त्यांनी बैठक केली. त्यावेळी फोन टॅपिंगचा मुद्दा समोर आला. हा मुद्दा समोर येताच त्यांनी आपला आयफोन हातात घेतला आणि मोदी सरकारवर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी पेगासस आणि इतर तांत्रिक मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यावेळी ते हेदेखील म्हणाले की मला माहित होतं की माझा फोन टॅप केला जातो आहे. मात्र मी त्यामुळे त्रस्त नाही असं राहुल गांधी म्हणाले आणि त्यांनी आयफोन काढला कानाला लावला आणि म्हणाले हॅलो मिस्टर मोदी. त्यांनी केलेल्या या मिश्कील कृतीनंतर ते हसूही लागले.
राहुल गांधी म्हणाले की, “मला वाटतं माझ्या या आयफोनचं टॅपिंग होतं आहे. भारतासारख्या देशात एका व्यक्तीप्रमाणेच एक डेटा सुरक्षेचेही काही विशिष्ट नियम असले पाहिजेत. जर देशाला वाटत असेल की फोन टॅप झाला पाहिजे तर त्यावर कुणी काहीही म्हणू शकत नाही. याबाबत मला तरी असंच वाटतं” असं राहुल गांधींनी म्हटलं आहे. जर देशाला वाटत असेल की विशिष्ट लोकांचे फोन टॅप झाले पाहिजेत तर त्याविरोधात काय लढा देणार? मला वाटतं की मी जे काही काम करतो आहे ते देशाच्या समोर आहे.
डेटा म्हणजे एक प्रकारचं सोनंच
राहुल गांधींनी सनीवेल या ठिकाणी प्लग अँड प्ले टेक सेंटर मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी काम करणाऱ्या उद्योजकांशी चर्चा केली.त्यावेळी त्यांच्यासह इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख सॅम पित्रोडाही उपस्थित होते. यावेळी राहुल गांधी यांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने भारतातल्या विविध गावांना कसं जोडता येईल? त्याचा काय परिणाम होईल या विषयांचीही चर्चा केली. यावेळी राहुल गांधी म्हणाले की डेटा म्हणजे एक प्रकारच्या सोन्यासारखं आहे. डेटा सुरक्षेच्या योग्य नियमांची गरज देशाला आहे.
राहुल गांधी मंगळवारपासून अमेरिका दौऱ्यावर आहेत. बुधवारी त्यांनी सॅनफ्रान्सिको मध्येही त्यांनी एक भाषण केलं होतं. या भाषणातही त्यांनी मोदी सरकारवर टीका केली होती. आता पेगासॅस आणि फोन टॅपिंगचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीका केली आहे.