उत्तराखंडातील नैसर्गिक आपत्तीच्या तडाख्यात सापडलेल्या ६०० गावांना विविध प्रकारची मदत करण्याचा ओघ सुरूच आहे. आतापर्यंत या गावांना २३७९ मेट्रिक टन गहू आणि २८७५ मेट्रिक टन तांदूळ पुरवण्यात आला आहे.
या गावांकडे जाणारे सर्व रस्ते उखडले गेल्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचणे कठीण होत आहे. हवामानातही सातत्याने बदल होत असल्याने मदतकार्यात अडथळे येत आहेत. मात्र, तरीही या गावांत अडकलेल्या सर्वाना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
बचावकार्यही सुरूच
आपद्ग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे लष्कर व हवाई दलाचे संयुक्त प्रयत्न अद्यापि सुरूच असून शनिवारी १३१३ यात्रेकरूंची सुटका करण्यात आली. काहींना हेलिकॉप्टरने तर काहींना रस्तामार्गे सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याचे उत्तराखंडचे मुख्य सचिव सुभाषकुमार यांनी सांगितले.
मृतांच्या आकडय़ाबाबत मौन
कुंजवाल यांनी मृतांच्या आकडय़ाबाबत केलेल्या भाष्याबाबत सुभाषकुमार यांनी मात्र काहीही बोलण्यास नकार दिला. अजूनही तीन हजार जण बेपत्ता आहेत. त्यांचा ठावठिकाणा लागेपर्यंत मृतांच्या आकडय़ाबाबत काहीही बोलणे इष्ट ठरणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
पुराची शक्यता नाही
उत्तराखंडात पावसाचा जोर ओसरला असून अनेक दिवसांनी सूर्याचे दर्शन झाले आहे. सूर्याच्या उष्णतेमुळे केदारनाथ परिसरातील हिमनद्या वितळून नद्यांना पुन्हा पूर येण्याची शक्यता हवामान खात्याने फेटाळून लावली आहे.
पुरातत्त्व विभाग पाहणी करणार
केदारनाथ मंदिर परिसराच्या हानीची पाहणी करण्यासाठी भारतीय पुरातत्त्व खात्याचे एक पथक केदारनाथला जाणार आहे. पाच जणांचे हे पथक मंदिर परिसराची पाहणी करून त्यासंदर्भात काय उपाययोजना आखाव्या लागतील याचा अहवाल सादर करणार आहे.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा