आसाममध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते हेमंत बिस्वा शर्मा यांनी आज (सोमवार) आसामच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली. त्यांच्यासोबत १३ कॅबिनेट मंत्र्यांनीही शपथ घेतली. रविवारी आसाम भाजपा विधिमंडळ पक्षाच्या नेते म्हणून शर्मा यांची निवड झाली. त्यानंतर हेमंत बिस्वा शर्मा यांनी रविवारी राजभवन येथे राज्यपाल जगदीश मुखी यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा सादर केला. राज्यपालांनी सरमा यांचा दावा स्वीकारला व त्यांना सरकार स्थापण करण्यासाठी आमंत्रण दिले.

आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा शर्मा आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यास भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब, मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा, मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग, नागालँडचे मुख्यमंत्री नीपीयू रिओ उपस्थित होते. तसेच माजी मुख्यमंत्री सरबानंद सोनोवाल हेदेखील उपस्थित होते.

मंत्रीमंडळात असाम भाजपाचे प्रमुख रंजीत कुमार दास, असाम गढ़ परिषद (एजीपी) प्रमुख अरमुखतुल बोरा, यूपीपीएल नेता यूजी ब्रह्मा, भाजपा नेते परिमल शुक्लबैद्य, भाजपा नेते चंद्र मोहन यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त केशब महंता, रंगोज पेगू, संजय किशन, जोगेन मोहन अजंता नियोंग, अशोक सिंघल, पीयूष हजारिका, बिमल बोरा यांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली.

कोण आहेत आसामचे नवे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा?

हेमंत बिस्वा शर्मा यांनी २०१५ साली काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला होता. माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्याशी असलेल्या मतभेदामुळे त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आपल्या सर्व पदाचा राजीनामा देत भाजपात प्रवेश घेतला. त्यांनी पक्षात प्रवेश केल्यानंतर आसाममध्ये भाजपाची ताकद चांगलीच वाढली. २०१६च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला घवघवीत यश मिळालं. त्यामुळे २०१६ च्या विधानसभा निकालानंतर हेमंत बिस्वा शर्मा यांचं नाव मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेत होतं. मात्र सर्बानंद सोनोवाल यांची निवड करण्यात आली होती. २०१६ च्या विधानसभेत त्यांना मंत्रिपद देण्यात आलं होतं. त्यांच्याकडे आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी होती. त्यांच्या या कार्यकाळात त्यांनी सीएए आणि करोना स्थिती हाताळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या कामाची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे.

हेमंत बिस्वा शर्मा यांनी दुसऱ्यांदा भाजपाला सत्ता मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आसामच्या बागपत जिल्ह्यातील जालुकबारी विधानसभेतून सलग पाचव्यांदा निवडून आले आहेत. हेमंत बिस्वा शर्मा यांनी काँग्रेसच्या रामेन चंद्र बोरठाकुर यांच्यापेक्षा १,०१,९११ अधिक मतं मिळवत विजय मिळवला. या विधानसभेसाठी एकूण ७७ टक्के मतदान झालं होतं.

हेमंत बिस्वा शर्मा यांचा जन्म १ फेब्रुवारी १९६९ रोजी झाला. हेमंत बिस्वा शर्मा यांनी कामरुप अकादमीतून शिक्षण पूर्ण केल्यानंतर कॉटन कॉलेज गुवाहटीमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर सरकारी लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली आणि गुवाहटी कॉलेजमधून पीएचडी केली. पाच वर्ष त्यांनी गुवाहटी न्यायालयात वकिली केली. त्यानंतर २००१ ते २०१५ या कालावधीत काँग्रेसकडून निवडणूक लढवली. आसामच्या जलकुबारी विधानसभेतून ते तीन वेळा निवडून आले. त्यानंतर २०१६ आणि २०२१ या विधानसभा निवडणुकीत ते दोनदा भाजपाच्या तिकीटावर जिंकले. त्यांचा दांडगा जनसंपर्क पाहता भाजपाने त्यांना नॉर्थ ईस्ट डेमोक्रेटिक अलायन्सचं प्रमुख पद दिलं आहे.

Story img Loader