Hemant Soren Resigned : सक्तवसुली संचालनालयाने कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी हेमंत सोरेन यांची बुधवारी (३१ जानेवारी) तब्बल ८ तास चौकशी केली. या चौकशीनंतर त्यांना अटकही करण्यात आली आहे. तत्पूर्वी हेमंत सोरेन यांनी झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर सोरेन यांनी त्वरित राजभवन गाठलं आणि राज्यपालांकडे त्यांचा राजीनामा सुपूर्द केला. दरम्यान, ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी पूर्ण केल्यानंतर ईडीच्या कार्यालयाबाहेर पडलेल्या हेमंत सोरेन यांनी ‘विक्ट्री साईन’ (विजयी झाल्याची बोटांनी केलेली प्रतिकात्मक खून) दाखवली आणि ते राजभवनाकडे मार्गस्थ झाले.
झारखंडचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष राजेश ठाकूर यांनी हेमंत सोरेन यांच्या राजीनाम्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तर चंपई सोरेन यांची सभागृह नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. चंपई सोरेन यांचीच मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे. चंपई सोरेन काही वेळापूर्वी राजभवनात दाखल झाले आहेत. लवकरच त्यांचा शपथविधी पार पडेल, अशी माहिती समोर आली आहे.हेमंत सोरेन यांच्यावरील कारवाईमुळे झारखंडमध्ये राजकीय संकट निर्माण झालं आहे.
सुरुवातीला चर्चा होती की हेमंत सोरेन हे त्यांची पत्नी कल्पना सोरेन यांची सभागृह नेतेपदी नियुक्ती करतील. परंतु, पक्षातील आमदारांबरोबरच्या बैठकीनंतर सभागृह नेता आणि मुख्यमंत्रिपदासाठी चंपई सोरेन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.
हे ही वाचा >> मोठी बातमी! झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने केली अटक, जमीन घोटाळा प्रकरणात कारवाई
चंपई सोरेन हे झारखंड मुक्ती मोर्चा पक्षातील वरिष्ठ नेते आहेत. ‘झारखंड टायगर’ या नावाने त्यांची राज्यभर ओळख आहे. चंपई झारखंडमधील सरायकेला मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. हेमंत सोरेन हे अनेक महत्त्वाचे राजकीय निर्णय घेताना चंपई यांचा सल्ला घेतात. मुख्यमंत्री बनल्यानंतरही हेमंत सोरेन यांनी अनेक राजकीय निर्णय चंपई यांच्या सल्ल्यानेच घेतले होते. त्याचबरोबर झारखंड मुक्ती मोर्चात चंपई यांचं चांगलंच वजन आहे.
(बातमी अपडेट होत आहे.)