केंद्रीय मंत्री शशी थरुर यांच्या पत्नी सुनंदा यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी त्यांच्या शरिरात ताणनाशक औषधांचा अंश आढळण्याची शक्यता त्यांचे शवविच्छेदन करणाऱ्या ‘एम्स’ रुग्णालयातील सूत्रांनी रविवारी व्यक्त केली. दरम्यान, सुनंदा यांच्या मृत्यूप्रकरणी शशी थरूर यांनी रविवारी उपविभागीय न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर जवाब नोंदवला.
सुनंदा यांचा मृत्यू अनैसर्गिक आणि आकस्मिक असल्याचा अहवाल ‘एम्स’मधील डॉक्टरांनी शनिवारी दिला होता. त्यानंतर मद्य आणि ताणनाशक औषधांच्या अतिसेवनामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची चर्चा सुरू होती. मात्र, सुनंदा यांच्या शरिरात मद्याचा अंश आढळला नसल्याचे रुग्णालयाने स्पष्ट केले. त्याचवेळी नैराश्य घालवण्यासाठी घेण्यात येणाऱ्या अल्प्राझोलम या रसायनाचे अंश त्यांच्या शरीरात आढळल्याचेही सूत्रांनी म्हटले आहे.