दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल टेक्नोसॅव्ही राजकारण्यांपैकी एक असून ते अनेकदा ट्विटरवरून आपली मते मांडताना दिसतात. मात्र, गेल्या काही दिवसांत केजरीवाल यांनी बॉलीवूड चित्रपटांसंदर्भात केलेल्या मतप्रदर्शनामुळे आज ट्विटरवर त्यांच्या ‘फिल्म रिव्ह्यूज’ची प्रचंड चर्चा रंगली होती. केजरीवाल नियमितपणे चित्रपट बघून ट्विटरवर त्यासंदर्भातील अभिप्राय व्यक्त करताना दिसतात. त्यामुळे ते अव्वल समीक्षक असल्याची उपरोधिक प्रतिक्रिया ट्विटरकरांकडून व्यक्त करण्यात आली आहे. दिल्लीत इतक्या समस्या असताना अरविंद केजरीवाल यांना ट्विटरवर चित्रपट समीक्षण करण्यासाठी इतका वेळ कसा काय, मिळतो असा सवालही ट्विटरकरांकडून उपस्थित करण्यात आला आहे. केजरीवाल यांनी ‘पीके’, ‘उडता’ पंजाब या चित्रपटासंदर्भात ट्विटरवर दिलेला अभिप्राय व्हायरल झाला होता.