लोकसत्ता बैरुत
इस्रायलच्या सैन्यदलाने शुक्रवारी बैरुतवर केलेल्या हवाई हल्ल्यात हेजबोलाचा प्रमुख कमांडर इब्राहिम अकील ठार झाल्याची माहिती इस्रायलने दिली. बैरुतच्या दक्षिण उपनगरांत इस्रायलने शुक्रवारी जोरदार हवाई हल्ले केले. या हल्ल्यात अकीलला लक्ष्य केल्याची पुष्टी लष्करी अधिकाऱ्यांनी दिली. अकीलने हेलबोलाच्या एलिट रडवान फोर्स आणि जिहाद कौन्सिल या लष्करी गटांचा प्रमुख म्हणून काम केले आहे. बैरूतमधील अमेरिकी दूतावासावर १९८३ मध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्यात अकिलचा हात असल्याचा आरोप अमेरिकेने केला होता.
इस्रायल, लेबनॉनचे एकमेकांवर हल्ले
इस्रायल आणि लेबनॉन या देशांनी शुक्रवारी एकमेकांवर हल्ले केले. हेजाबोलाने उत्तर इस्रायलावर तीन हल्ले केले असून त्यात १४० क्षेपणास्त्रे डागली. त्याला प्रत्युत्तर देत इस्रायलने लेबनॉनची राजधानी बैरुतमध्ये हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये किमान आठ जण ठार झाले, तर ६० जण जखमी झाले. बैरुतच्या दक्षिण उपनगरांमध्ये शुक्रवारी संध्याकाळी इस्रायलने हल्ले केले. नागरिक कामावरून आणि विद्यार्थी शाळेतून घरी जात असताना हे हल्ले झाले. या हल्ल्यांत बैरुतमध्ये अनेक इमारती, वाहनांचे नुकसान झाले.
हेजबोजाने इस्रायलच्या उत्तर भागांत क्षेपणास्त्रांचा मारा केला. १४० क्षेपणास्त्रांपैकी २० क्षेपणास्त्रे मेरॉन आणि नेटुआ भागात डागण्यात आली. त्यापैकी बहुतेक मोकळ्या भागात पडली. हेजाबोलाने सांगितले की क्षेपणास्त्रे दक्षिण लेबनॉनमधील गावे व घरांवर इस्रायली हल्ल्यांचा बदला म्हणून होती. दोन दिवसांच्या हल्ल्यांनंतर इस्त्रायलला मात्र दोष दिला जात नाही, ज्यांनी पेजर व वॉकीटॉकीच्या माध्यमातून शेकडो स्फोट घडवून आणले.