गुरुदासपूरच्या टिबरी लष्करी कॅण्टॉनमेण्ट परिसरानजीकच्या गावातील स्थानिकांनी दोन इसम लष्कराच्या वेशात संशयास्पद रीतीने फिरत असल्याचे सांगितल्याने सुरक्षारक्षकांनी हा परिसर पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. गुरुदासपूर आणि पठाणकोट जिल्ह्य़ांमध्ये सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

या परिसराला संपूर्ण वेढा घालण्यात आला असून शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. मात्र आतापर्यंत कोणत्याही प्रकारच्या संशयास्पद हालचाली आढळलेल्या नाहीत, असे पोलिसांनी सांगितले.

कोणतीही संशयास्पद व्यक्ती दिसलेली नाही, परिसराला सुरक्षारक्षकांनी वेढा घातला असून प्रत्येकाची कसून तपासणी केली जात आहे, असे गुरुदासपूरचे ज्येष्ठ पोलीस अधीक्षक गुरप्रीतसिंग तूर यांनी सांगितले.

या परिसरातील सर्व नागरिकांची शारीरिक तपासणी केली जात असून प्रत्येक वाहनाचीही बारकाईने तपासणी केली जात आहे आणि परिस्थिती नियंत्रणाखाली आहे, असेही ते म्हणाले.

मोहीम अखेरच्या टप्प्यात

पठाणकोट- पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यात सुरक्षा रक्षकांनी ज्या चार दहशतवाद्यांना ठार केले त्यांचे मृतदेह गुरुवारी शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. दरम्यान, संपूर्ण हवाई तळ दहशतवाद्यांपासून मुक्त करण्याची मोहीम अखेरच्या टप्प्यात आहे.

शनिवारी हवाई दलाच्या तळावर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी सुरक्षा रक्षकांनी सर्व म्हणजे सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.

त्यापैकी चार जणांचे मृतदेह सुस्थितीत होते, तर अन्य दोघांच्या शरीराच्या चिंधडय़ा उडाल्या होत्या. चार दहशतवाद्यांचे मृतदेह येथील सिव्हिल रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले आहेत.

दरम्यान, हवाई तळाचा संपूर्ण परिसर दहशतवाद्यांपासून मुक्त करण्याची मोहीम अखेरच्या टप्प्यात आहे, काम प्रगतिपथावर आहे, असे पठाणकोटचे ज्येष्ठ पोलीस अधीक्षक आर. के. बक्षी यांनी सांगितले. ज्या ठिकाणी सुरक्षा दलाचे सात कर्मचारी शहीद झाले आणि सहा दहशतवादी ठार झाले तेथे मोहीम सुरू आहे, असेही ते म्हणाले.

संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी, हा परिसर आता दहशतवाद्यांपासून मुक्त झाला असल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. मात्र शोधमोहीम पूर्ण होईपर्यंत आपण अहवाल देणार नसल्याचे बक्षी म्हणाले.

Story img Loader