पश्चिम बंगालमधील संदेशखाली प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याचे आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने आज (१० एप्रिल) दिले आहेत. संदेशखाली येथील काही महिलांवर लैंगिक अत्याचार आणि जमीन बळकावण्याचा आरोप आहे. या प्रकरणामध्ये तृणमूल काँग्रेसचे नेते शेख शाहजहान, शिबू हाजरा, उत्तम सरदार आरोपी आहेत. या तीन नेत्यांना पोलिसांनी अटक केलेले आहे. आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत होणार आहे.
नेमके प्रकरण काय?
पश्चिम बंगालच्या २४ उत्तर परगणा जिल्ह्यातील संदेशखाली या गावातील काही महिलांवर सामूहिक अत्याचार झाल्याचा आणि गरिबांची जमीन बळकाविण्याचे प्रकार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणावरुन तृणमूल काँग्रेस आणि पश्चिम बंगालमधील विरोधी पक्ष भाजपी यांच्यात संघर्ष सुरु आहे. यानंतर या प्रकरणाचा आरोप असलेले तृणमूल काँग्रेसचे नेते शेख शाहजहान यांना पश्चिम बंगाल पोलिसांनी २९ फेब्रुवारीला अटक केली होती. यानंतर आता पोलिसांनी त्यांना सीबीआयच्या ताब्यात दिले आहे.
संदेशखाली प्रकरणाच्या सुनावणीवेळी कोलकाता उच्च न्यायालयाने सुनावणीवेळी काही महत्वपूर्ण टिप्पणी केली. यामध्ये प्रशासन आणि सत्ताधारी १०० टक्के नैतिकदृष्ट्या जबाबदार असल्याचे न्यायालयाने मत नोंदवले. मुख्य न्यायमूर्ती टीएस शिवज्ञानम आणि न्यायमूर्ती हिरणमय भट्टाचार्य यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.
न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी होणार
संदेशखाली प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याचे आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने दिले. मात्र, या संपूर्ण प्रकरणाचा तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली होईल, असेही खंडपीठाने स्पष्ट केले. याबरोबरच सीबीआय तपासाचा अहवाल न्यायालयात सादर केला जाईल. तसेच या प्रकरणाची पुढील सुनावणी आता २ मे रोजी पुन्हा होणार आहे.