Delhi Aap Minister Viral Video: शनिवारी संध्याकाळी दिल्लीमध्ये एक अजब प्रकार घडला असून त्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या प्रकारावरून दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्ष व विरोधक भारतीय जनता पक्ष यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. कारण खुद्द मुख्यमंत्र्यांच्या समोरच आम आदमी पक्षाचे आमदार व सरकारमधील मंत्री सौरभ भारद्वाज यांनी चक्क भाजपा आमदार विजेंदर गुप्ता यांचे पाय धरले. विशेष म्हणजे हा सगळा प्रकार थेट दिल्ली सचिवालयाच्या दाराशीच चालू होता!

नेमकं घडलं काय?

दिल्लीच्या सरकारी बस वाहतुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या १० हजार सुरक्षा स्वयंसेवकांना गेल्या वर्षी कामावरून काढून टाकण्यात आलं. सिव्हिल डिफेन्स संचलनालयाकडून घेण्यात आलेल्या हरकतीनंतर ही कारवाई करण्यात आली. मात्र, आता या स्वयंसेवक कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून त्यांना सेवेत कायम करण्यासंदर्भातील निवेदन राज्यपालांना देण्याचा प्रस्ताव दिल्लीच्या मंत्रिमंडळानं मंजूर केला. पण त्यासाठी भाजपा आमदार विजेंदर गुप्ता यांच्यासह राज्यपालांच्या भेटीसाठी जाण्याचं ठरलं.

दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिषी यांनी दुपारी विजेंदर गुप्ता यांची सचिवालयात भेट घेतली. त्यांना सोबत येण्यासाठी राजीही केलं. त्यानुसार दिल्ली सरकारचं शिष्टमंडळ खुद्द मुख्यमंत्री आतिशी यांच्या नेतृत्वाखाली राज्यपालांच्या भेटीसाठी निघालं. ठरल्यानुसार विजेंदर गुप्ताही खाली उतरले. पण खाली उतरल्यानंतर विजेंदर गुप्ता आपच्या शिष्टमंडळासोबत जाण्यास टाळाटाळ करू लागले. खुद्द मुख्यमंत्री अतिषी गुप्ता यांच्या गाडीत जाऊन बसल्या. त्यामुळे विजेंदर गुप्तांची पंचाईत झाली व ते गाडीत बसण्यास टाळाटाळ करू लागले.

…आणि आपच्या मंत्र्यांनी गुप्तांचे पाय धरले!

हा सगळा प्रकार पाहून आम आदमी पक्षाचे आमदर व दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी थेट विजेंदर गुप्ता यांचे पाय धरले. त्यांच्यापाठोपाठ आपच्या इतरही काही नेत्यांनी गुप्तांचे पाय धरले व ते त्यांना सोबत येण्याची विनंती करू लागले.

दिल्ली विधानसभा निवडणुकीआधी ‘आप’कडून रामायणाचा प्रचारात वापर; आतिशी यांनी खुर्ची मोकळी सोडून काय साधले?

रस्त्यातही गुप्तांनी मध्येच गाडी थांबवली

दरम्यान, आप आमदारांच्या आग्रहानंतर विजेंदर गुप्ता अखेर गाडीत बसले. पण पुढे रस्त्यातच त्यांनी गाडी थांबवली आणि माघारी वळण्याची तयारी करू लागले. त्याचवेळी आपच्या आमदारांसह कार्यकर्त्यांनी त्यांना अडवलं व गाडी मागे घेता येणार नाही असं सांगत रस्त्यावरच गोंधळ सुरू झाला. यावेळी मुख्यमंत्री स्वत: गाडीत बसलेल्या होत्या.

दुसरीकडे राज्यपालांच्या शासकीय कार्यालयाबाहेरही आपच्या आमदारांनी आंदोलन केलं. त्यातील काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं. राज्यपालांनी स्वयंसेवक कर्मचाऱ्यांसह भेटण्याची वेळ दिली नाही, असं म्हणत आपनं टीका केली. मात्र, भाजपानं राज्यपालांच्या बैठकीचे फोटो शेअर करत आपचा दावा खोटा असल्याचं म्हटलं. राज्यपालांनी या मार्शल्सशी चर्चा करून त्यांचे मुद्दे समजून घेतले व त्याची गंभीर दखलही घेतली असं भाजपानं सांगितलं.